माहितीचे महाजाल, संगणक, भ्रमणध्वनी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांच्या आक्रमणात तसेच ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ आणि ‘व्हॉट्स अॅप’च्या विळख्यात आपली संस्कृती, परंपरा हरवतेय का? असे वाटते आहे. मात्र मुंबई शहर आणि उपनगरांत होणारे ‘दिवाळी पहाट’कार्यक्रम आपल्या मनावरची ही मरगळ दूर करतात. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे वातावरण आपल्यात नवा उत्साह, उमेद जागवितात. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहेत..
मुंबई शहर आणि उपनगरांतील रसिकांसाठी दिवाळी आणि ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम यांचे एक अतूट नाते आहे. विविध सांस्कृतिक संस्था आणि संघटनांकडून दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी हे कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांची परंपरा सुरू असून त्याला रसिकांचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे. भावगीत, चित्रपट गीत, नाटय़संगीत, शास्त्रीय गायन किंवा वादन अशा विविध स्वरूपात या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
माहितीचे महाजाल, संगणक, भ्रमणध्वनी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांच्या आक्रमणात तसेच ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ आणि ‘व्हॉट्स अॅप’च्या विळख्यात आपली संस्कृती, परंपरा हरवतेय का? असे वाटते आहे. मात्र मुंबई शहर आणि उपनगरांत होणारे ‘दिवाळी पहाट’कार्यक्रम आपल्या मनावरची ही मरगळ दूर करतात. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे वातावरण आपल्यात नवा उत्साह, उमेद जागवितात.
सर्वसाधारणपणे नरक चतुर्दशीच्या दिवशी (दिवाळीतील पहिले अभ्यंगस्नान) विविध ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले जातात. मंबई आणि उपनगरांत सध्या या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांची लगबग सुरू झाली आहे. संस्थांचे कार्यकर्ते आणि आयोजक त्याच गडबडीत आहेत. सगळ्या क्षेत्रांत वाढलेल्या महागाईचा फटका मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांनाही काही प्रमाणात बसला आहे. मात्र असे असले तरी कार्यक्रमाच्या ‘बजेट’ला कात्री लावून, अन्य खर्च कमी करून ‘दिवाळी पहाट’ची स्वरमैफल त्याच उत्साहात आणि आनंदात साजरी करण्याचे आयोजकांनी ठरविले आहे. गिरगाव, दादर, विलेपाल्रे, बोरिवली, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईत वाशी, बेलापूर इथे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम यंदाही आयोजित करण्यात आले आहेत.
खर्चाला कात्री लावून ..
‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातील नेपथ्य, व्यासपीठ, प्रकाशयोजना, कलावंतांना दिले जाणारे मानधन आदी खर्चात काही प्रमाणात कपात करून खर्च आटोक्यात आणला जात आहे. काही संस्थांनी मोठय़ा सभागृहात कार्यक्रम न करता शाळा किंवा महाविद्यालयांच्या सभागृहात किंवा त्यांच्या पटांगणात कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे. दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा महागाईमुळे सर्वच खर्च वाढला आहे. मात्र असे असले तरी अन्य गोष्टींवरील खर्च कमी करून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. खर्च कमी केला असला तरी कार्यक्रमाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कुठेही तडजोड केली जाणार असल्याचे बोरिवली येथील एका आयोजकांनी सांगितले. काही संस्था ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य सादर करतात तर काही आयोजक शुल्क आकारून तसेच मोठे प्रायोजक मिळवून कार्यक्रम आयोजित करतात.
‘दिवाळी पहाट’चे विविध कार्यक्रम
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही आनंदाच्या क्षणांची पखरण करण्यासाठी ‘व्हॅल्युएबल ग्रुप’ प्रस्तुत एक विशेष कार्यक्रम रविवार, ८ नोव्हेंबर सायंकाळी साडेसहा वाजता पाल्रे टिळक विद्यालय, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार आहे. प्रसिद्ध पाश्र्वगायक सुरेश वाडकर, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, श्रीकांत नारायण, हृषीकेश रानडे, अनिरुद्ध जोशी, सोनाली कर्णिक हे गायक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आशा भोसले यांची विशेष उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे.
‘रंगस्वर’ आयोजित ‘सूर प्रभात’ हा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम १० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइंट येथे होणार आहे. कलापिनी कोमकली व पं. व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय गायनाची सुरेल मैफल या वेळी सादर होणार आहे.
‘गगन सदन तेजोमय’ची यंदा बारावी ‘दिवाळी पहाट’ आहे. या कार्यक्रमात सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या व्यक्तींना ‘ध्यास’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या वर्षी हरखचंद सावला, अनुराधा प्रभुदेसाई, संदीप गुंड यांना तसेच ‘मातृछाया ट्रस्ट’ या संस्थेचा सत्कार केला जाणार आहे. हा कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे सकाळी पावणेसात वाजता होणार आहे. ‘कॉक्स अॅण्ड किंग्ज’ व ‘युवर सिंगापूर’ प्रस्तुत या कार्यक्रमाची संकल्पना विनोद आणि महेंद्र पवार यांची आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची दहिसर शाखा आणि ‘स्वरानुजा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता ग्रंथालयाचे सभागृह, पहिला मजला, दहिसर (पूर्व) येथे ‘दिवाळी पहाट’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
‘अनुबोध’ आणि ‘नवचैतन्य प्रतिष्ठान’ची दिवाळी पहाट
अनुबोध आणि नवचैतन्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ‘गीत तारकांचे’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तीन अभिनेत्रींवर चित्रित झालेली ३० लोकप्रिय गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहेत. आर्या आंबेकर, मधुरा कुंभार, यशोदा बुधकर, जयश्री बागवाडकर हे गायक कार्यक्रमात सहभागी होणार असून मुंबई कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘कटय़ार काळजात घुसली’चा प्रीमिअर
‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. १० नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मुंबईत ‘कटय़ार काळजात घुसली’चा प्रीमिअर होणार असून चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दिव्याने दिवा लागला यात आनंद!
आमच्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ या संस्थेने २९ वर्षांपूर्वी ‘दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली. आज महाराष्ट्रात सुमारे ४०० हून अधिक ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम होत आहेत, याचा आनंद आणि अभिमान वाटतो. मात्र काही जण याचा ‘व्यवसाय’ करत असल्याचे पाहून वाईटही वाटते. आम्ही आमच्या कार्यक्रमांचा खर्च पूर्वीपासूनच कमी ठेवला आहे. त्यामुळे महागाईची आणि मंदीची झळ बसली असली तरी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ कमी खर्चात दर्जेदार कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करते. ‘चतुरंग’वर प्रेम करणारे रसिक आणि ही परंपरा पुढे जावी असे वाटणाऱ्या कलाकारांमुळेच ‘दिवाळी पहाट’ अखंड सुरू आहे.
– विद्याधर निमकर , चतुरंग प्रतिष्ठान