पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसनंतर आता डीएमके पक्षानं देखील मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणूक होईपर्यंत या चित्रपटावर पूर्ण बंदी घालावी अशी मागणी डीएमके पक्षानं केली आहे. यासाठी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं आहे. या चित्रपटात भाजपाचा छुपा अजेंडा लपला असून निवडणुकांच्या प्रचारासाठी त्याचा वापर केला जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वी गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थीसेनेनं ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. देशात ११ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. तेव्हा मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी हा चित्रपट काढला असल्याचा आरोप दोघांचा आहे. संभाव्य वाद लक्षात घेता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली . मोदींचा बायोपीक आता ५ एप्रिलला २३ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र निवडणूक संपेपर्यंत या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी या दोन पक्षानं केली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे.