क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी हेजल किच बॉलिवूड अभिनेत्री आहे हे अनेकांना माहितच आहे. पण हेजलने ‘हॅरी पॉटर’ या ब्रिटीश- अमेरिकन फिल्म सीरिजमध्ये काम केलंय हे फार क्वचितच कोणाला माहित असेल. यासंदर्भात स्वत: हेजलने एका मुलाखतीत सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बालकलाकार म्हणून हेजल ‘हॅरी पॉटर’ सीरिजच्या तीन चित्रपटांमध्ये झळकली होती.

शिबानी दांडेकरच्या ‘मिस फिल्ड’ या टॉक शोमध्ये हेजलने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने शिबानीसोबत बऱ्याच गप्पा मारल्या. सलमान खान- करिना कपूर खान यांच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून हेजलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी ‘हॅरी पॉटर’ या प्रसिद्ध चित्रपटात तिने हॉगवर्ट्समधल्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर अँड द फिलोसॉफर्स स्टोन’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द प्रिसनर ऑफ अझ्कबान’ या तीन चित्रपटांमध्ये हेजलने काम केलं.

वाचा : ‘.. घरात प्रवेश नाही’; चिडलेल्या काजोलचा अजयला इशारा

‘पाश्चिमात्य देशातल्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. त्यांची काम करण्याची पद्धत मला फार आवडली. प्रत्येक विद्यार्थ्याचा मेकअप आणि केशरचना सारखी असावी यासाठी अत्यंत बारकाईने त्यांचं लक्ष असायचं. १६ वर्षांखालील कलाकारांसाठी सेटवर शिक्षकसुद्धा असायचे,’ असं तिने सांगितलं.

हेजल आणि युवराजने नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. हेजलने बॉलिवूडसोबतच काही टॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.

Story img Loader