Zakir Hussain तबला वादन हा ज्यांचा श्वास होता त्या झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन हे अमेरिकेत वास्तव्य करत होते. रविवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. झाकीर हुसैन यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात भारतीय शास्त्रीय संगीतापासूनच केली होती. मात्र आपल्या अद्वितीय शैलीमुळे झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) जागतिक स्तरावरचे प्रसिद्ध कलाकार झाले. त्यांना पहिलं मानधन किती मिळालं होतं? हा किस्सा मोठा रंजक आहे.
कोण होते झाकीर हुसैन?
९ मार्च १९५१ या दिवशी जन्मलेले झाकीर हुसैन यांचे ( Zakir Hussain ) वडील सुप्रसिद्ध तबला वादक अल्ला राखा खान हे होते, तर त्यांच्या आईचं नाव बावी बेगम होतं. वयाच्या सातव्या वर्षांपासून तबल्यावर त्यांची बोटं आणि हातांची थाप पडू लागली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते तबला वादनाचे कार्यक्रम करु लागले. वॉशिंग्टन येथील विद्यापीठात त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवीही घेतली. त्यांचे दरवर्षी साधारण १५० कार्यक्रम होत असत.
हे पण वाचा- झाकीर हुसैन यांचे पूर्ण नाव काय होते, त्यांची पत्नी आणि मुली काय करतात? जाणून घ्या
झाकीर हुसैन यांना मिळालेलं पहिलं मानधन होतं ५ रुपये
झाकीर हुसैन यांना तबला वादन इतकं आवडत होतं की त्यांच्या हाती एखादं भांडं आलं तरीही त्यातून ते एखादा सूर काढून दाखवत असत. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते वडिलांसह कार्यक्रमांमध्ये तबला वादन करत होते. जेव्हा ते १२ वर्षांचे होते त्यावेळी उस्ताद अल्ला राखा खान, पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद बिस्मिल्लाह खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांना भेटले. झाकीर हुसैन यांनी १२ व्या वर्षी वडिलांसह तबला वादन केलं तेव्हा त्यांना ५ रुपये मानधन मिळालं होतं. हे पाच रुपये माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत असं झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना
२०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले. त्यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘साझ’ हा चित्रपट चर्चेत राहिला. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा उत्तम मिलाफ होऊ शकतो असा विचार झाकीर हुसैन यांनी केला. पंडित रवि शंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. १९७० मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, “शक्ती” नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली. त्यामुळे भारतीय संगीत हे जागतिक स्तरावर पोहचलं.