मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ हा भन्नाट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हा चित्रपट प्रेम, मैत्री आणि लग्न याविषयावर आधारित असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटामध्ये अभिनेता सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सुव्रत आणि प्राजक्ताचा लग्नसोहळा दाखविण्यात आला असून सुव्रतच्या मित्रांना मात्र या लग्नामध्ये वेगळीच चिंता भेडसावत आहे.
या चित्रपटामध्ये सुव्रत हा मराठी कुटंबातला आहे. तर प्राजक्ता साऊथ इंडियन त्यामुळे लग्नानंतर या दोघांच्या आयुष्यात होणारे बदल आपला मित्र सहन करु शकेल का ही चिंता सुव्रतच्या मित्रांना सतावत आहे. त्यामुळे लग्नापूर्वी ते सुव्रतला सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच तरूण पिढीला लग्नाच्या आधी आणि नंतर वाटणारी भीती, हुरहूर, तणाव, जबाबदारी याचे दर्शन या टीझरमधून घडत आहे.
ज्यांचे लग्न होणार आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहे, अशा प्रत्येक जोडप्याला हा चित्रपट स्वानुभवाची जाणीव करून देणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. तर सुमन साहू यांनी चित्रित केला आहे. येत्या १ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे