समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी अलिकडेच बलात्कारासारख्या गंभीर विषयावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाची प्रसिद्धी न करण्याची विनंती चाहत्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना केली आहे. एक कुस्तीपटू ते राजकारणी असा मुलायमसिंह यांचा जीवनप्रवास ‘नेताजी – मुलायमसिंह यादव’ नावाच्या आगामी चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. change.org संकेतस्थळावर दाखल करण्यात आलेल्या याबाबतच्या याचिकेवर ‘बिग बीं’च्या हजारो चाहत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मिताली दादवल नावाच्या दिल्लीस्थित महिलेने दाखल केलेली ही ऑनलाईन याचिका व्हायरल झाली असून, पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकांनी एक दिवसापेक्षा ही कमी काळात यावर स्वाक्षरी केली.
अमिताभ बच्चन यांनी ‘नेताजी’ चित्रपटाची प्रसिद्धी करणे म्हणजे मुलायमसिंह यादव यांनी स्त्रियांबाबत काढलेल्या अनुद्गारचे समर्थन केल्यासारखे होईल, अशी भावना दादवल यांनी व्यक्त केली.
“एका व्यक्तीकडून बलात्काराचा गुन्हा झाला असला, तरी अनेकवेळा चार जणांविरुद्ध तक्रार केली जाते. बलात्कारात चारजणांची नावे गोवली जातात, हे शक्य आहे का?” अशी मुक्ताफळे मुलायमसिंह यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात उधळली होती. दिग्दर्शक विवेक दीक्षित यांच्या ‘नेताजी – मुलायमसिंह यादव’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अलाहाबाद येथे जन्मलेल्या ७२ वर्षीय अमिताभ बच्चन यांना विचारणा करण्यात आल्याचे समजते.

Story img Loader