दीपिकाला फॅशनबद्दल काहीच कळत नाही. तिची जनसंपर्क अधिकाऱ्यांची टीम जरा जास्तच उत्साहात असते, अशी शेरेबाजी सोनम कपूरने केली खरी.. पण, त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत दीपिकाने तिच्या विधानांबरोबर तिचाही खरपूस समाचार घेतला. मग तिने कोणाचेही नाव न घेता बॉलीवूडमध्ये सामान्य चेहऱ्यांच्या अभिनेत्रींना कसे चांगले चित्रपट मिळतात, अशा आशयाचे नवीन विधान केले आणि का कोण जाणे सोनम जणू आपल्यालाच बोलली असावी या आविर्भावात कंगनाने तिच्याविरोधात जाहीर भांडण उकरून काढले. आपल्या तथाकथित खेळकर विधानांवरून बॉलीवूडजनांमध्ये फुटलेले अंगारे पाहिल्यानंतर आता त्यांच्या वाटय़ालाच जायचे नाही, असे सोनमने ठरवून टाकले आहे.
‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूरला विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर तिने आपल्या विनोदबुद्धीच्या कुवतीप्रमाणे उत्तरे दिली खरी पण, तिची ही विनोदबुद्धी तिच्या समकालीन नटय़ांना मात्र अजिबात आवडलेली नाही. सोनमच्या या विधानांविरोधात प्रत्येकीने आपापल्या परीने बोंब ठोकली आहे. त्यामुळे आधीच उथळ विचारांची अशी प्रतिमा असलेल्या सोनमबद्दल ‘आली मोठी शहाणी..’ असा उलट पवित्रा अन्य नटय़ांनी घेतल्याने तिच्याविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर ‘लॉरिएल’च्या कार्यक्रमासाठी आलेल्या सोनमला विचारणा करण्यात आली. आपल्या विधानांमुळे काय गोंधळ झाला आहे याची चांगलीच जाणीव असलेली सोनम जणू या प्रश्नासाठी तयारीतच आली होती. ‘कॉफी विथ करण’ हा एक छान आणि अनौपचारिक गप्पांचा शो आहे. त्यात मी जी विधाने केली होती ती गंमत म्हणूनच केली होती आणि ती गंमत म्हणूनच संबंधितांनी स्वीकारावी अशी साधी अपेक्षा होती. पण, हे तर माझ्यावरच उलटले आहेत, अशी प्रतिक्रिया सोनमने व्यक्त केली.
माझ्या विनोदामुळे लोक खरेच दुखावली जातील, असे मला वाटले नव्हते.. एवढे सांगून थांबली तर ती सोनम कुठली. बॉलीवूडमधील लोकांची विनोदबुद्धीच कमी होत चालली आहे, हेच यावरून दिसते असा निष्कर्षही काढून ती मोकळी झाली. म्हणे या कार्यक्रमानंतर तिच्यावरही एका कंपनीने अशीच विनोदी चित्रफीत बनवली होती. पण, त्यांच्यावर न रागावता मी स्वत:च माझ्यावरची ती विनोदी चित्रफीत ट्विटरवर टाकली, असा किस्सा तिने ऐकवला. थोडक्यात, तिने केलेल्या विनोदांकडे इतरांनी गंमत म्हणून पाहावे एवढीच तिची अपेक्षा होती. पण, तसे न झाल्याने यापुढे मी राजकीय किंवा सामाजिक विधाने करेन पण, बॉलीवूडबाबतीत एकही शब्द उच्चारणार नाही, असा निर्धारच तिने व्यक्त केला आहे.