माणूस जागेपणी जी स्वप्ने बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो त्याची कथा म्हणजे ‘डबल सीट’. आपण सगळेचजण स्वप्न बघत असतो. आपल्याला झोपेतही कित्येक स्वप्ने पडतात. पण झोपेतून जागे झाल्यावर विरून जाणारी ती खरी स्वप्ने नव्हेत. जागेपणी बघितलेल्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या आपल्यासारख्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या प्रवासाची कथा ‘डबल सीट’ या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक माणसाला एक नवी ऊर्जा या चित्रपटातून मिळेल, असा विश्वास अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला.

आपल्याच ‘ग्लॅमरस’ प्रतिमेतून बाहेर येऊन मध्यमवर्गीय घरातला अमित देसाई रंगवणारा अभिनेता अंकुश चौधरी, त्याच्या जोडीला मुक्ता बर्वेसारखी सक्षम अभिनेत्री आणि त्यांच्या जोडीच्या माध्यमातून मुंबईसारख्या धावणाऱ्या शहरात स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्याची वास्तव कथा मांडण्याचा प्रयत्न समीर विद्वांस दिग्दर्शित ‘डबल सीट’ या चित्रपटात करण्यात आला आहे. एस्सेल व्हिजनची निर्मिती असलेल्या ‘डबल सीट’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात नुकतीच भेट दिली. अमित देसाई आणि मंजिरी या जोडप्याची कथा चित्रपटात आहे. अमित एका कुरिअर कंपनीत काम करतो आहे तर मंजिरी एक विमा एजंट आहे. सतत स्वप्ने पाहणारी आणि त्यासाठी धडपडणारी मंजिरी आणि मंजिरीबरोबर याच स्वप्नांना जगू पाहणारा अमित यांची ही कथा केवळ मुंबईसारख्या शहरातली नाही तर ती कोल्हापूर, जळगाव, नाशिक, पुणे अशा महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात राहणाऱ्यांची कथा असू शकते. त्यामुळे मुंबईतील चाळसंस्कृती किंवा तिथे राहणाऱ्यांचीच ही कथा आहे, असे मानणे चुकीचे ठरेल, असे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी स्पष्ट केले.

आजच्या काळात चांगली नोकरी आणि आपले घर हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेऊन हप्त्यांमागे धावणाऱ्यांमध्ये आपण सगळेच आहोत. मग ‘डबल सीट’च्या माध्यमातून रोजचेच जगणे पडद्यावर पाहण्यात काय अर्थ आहे?, असा एक प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो. पण, रोजच्या जगण्यातही आपले एखादे आवडते गाणे, एखादी कथा, एखादा प्रसंग आपल्याला नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात येणारे नैराश्य दूर पळवतो. आपल्याला पुन्हा त्याच वेगाने आणि जिद्दीने पुढे जाण्यासाठी बळ देतो.

अमित आणि मंजिरीच्या स्वप्नपूर्तीची कथा ही प्रेक्षकांना अशीच ऊर्जा आणि आनंद मिळवून देणारी आहे, असे अभिनेत्री मुक्ता बर्वेने सांगितले. ‘डबल सीट’ हा चित्रपट १४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मारलेल्या गप्पा, ‘दुनियादारी’तील डीएसपी ते ‘डबल सीट’चा अमित हा अंकुशमध्ये झालेला बदल जाणीवपूर्वक आहे का?, मुक्ताने साकारलेली मंजिरी ही आजच्या तरुणीचे प्रतिनिधित्व करणारी आहे का?, दोन पिढय़ांच्या स्वप्नांमध्ये दुवा सांधू पाहणारी वंदना गुप्ते यांनी साकारलेली आई आणि आपल्या रोजच्या जगण्यातले स्वप्न चित्रपटाच्या माध्यमातून एवढय़ा भव्य स्वरूपात आपल्याचसमोर आणण्याचे धाडस करू पाहणाऱ्या दिग्दर्शक समीर विद्वांसचा अनुभव अशा अनेक गोष्टी ‘रविवार वृत्तांत’मध्ये वाचता येतील.

Story img Loader