‘शेर शिवराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. एकीकडे त्यांच्या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक सुरू आहे तर दुसरीकडे त्यांच्या चित्रपटाला प्राइम टाइममध्ये स्थान न मिळाल्यानं खंत व्यक्त केली जातेय. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर आपलं मत देखील मांडलं आहे. पण हे सर्व सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत दिग्पाल लांजेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले.. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!’

या व्हिडीओमध्ये डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, “आजचा हा व्हिडीओ तयार करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण दोन तीन दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल. पण माझा त्या कलाकृतीशी कोणताही संबंध नसताना अप्रक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझा उल्लेख करण्यात आलं. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला म्हणून मी पोस्ट करणं मला गरजेचं वाटतं. अनेकदा अशा गोष्टींकडे कानाडोळा केला पाहिजे पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात.”

आणखी वाचा- “छत्रपती शिवरायांवरील चित्रपटाला स्क्रिनसाठी झगडावं लागतंय”, चिन्मय मांडलेकरनं व्यक्त केली खंत

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “मी आता पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा शंभूराजे म्हणा ज्या ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत त्या पूर्णपणे नतमस्तक होऊन साकारल्या आहेत. असं असताना अशाप्रकारच्या पोस्ट लिहून त्या शेअर करून माझी रेषा मोठी हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा जो विखारी प्रयत्न सुरू आहेत तो दुर्देवी आहे आणि ही माझी संस्कृती नाही. मी कोणाचाही विरोध किंवा निषेध करत नाही. तर सदर पोस्ट लिहिणाऱ्यांचे आणि शेअर करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.”

(फोटो- डॉ. अमोल कोल्हे इन्स्टाग्राम)

काय होती पोस्ट?
दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं कौतुक करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या होत्या. अशीच एक पोस्ट दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुक पेजवरू शेअर करण्यात आली होती आणि त्यात एक मुद्दा, ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा..’ अशा पद्धतीने लिहिण्यात आला होता. ज्यावर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा- “अजून किती वर्ष हा त्रास…”, ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं आस्ताद काळेची संतप्त पोस्ट

दिग्पाल लांजेकर यांनी मागितली माफी
डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्हिडीओ पोस्टनंतर ‘शेर शिवराज’चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर करत डॉ. अमोल कोल्हे यांची जाहीर माफी मागितली आहे. “चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट अनेक चाहते करत होते अशात आमच्या सोशल मीडिया टीमकडून सदरची पोस्टही अनावधनानं शेअर झाली होती. पण संबंधित मुद्दा लक्षात आल्यानंतर आम्ही ती पोस्ट डिलिट केली होती. यातून डॉ. अमोल कोल्हे यांचा अपमान करण्याचा हेतू नाही किंवा त्यांच्याबद्दल आमच्या मनात कोणत्याही प्रकारची आकस नाही. आम्ही हे जाणीवपूर्वक केलेलं नाही. पण तरीही मी त्यांची माफी मागतो.” असं त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader