ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विक्रम गोखलेंचा एक फोटो शेअर करत त्यावर एक कविता लिहिली आहे.
आणखी वाचा : “माहेरची साडी चित्रपटावेळी आम्ही…” अलका कुबल यांनी सांगितली विक्रम गोखलेंची आठवण
अमोल कोल्हेंनी विक्रम गोखलेंसाठी केलेली कविता
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!
जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता
कॅमेराला डबल लूक देईल ,
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून
पानभर संवाद बोलला जाईल
जेव्हा जेव्हा घेतलेल्या पाॅज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल
जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून
पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील
जेव्हा जेव्हा ‘बिटवीन द लाईन’
संवादापेक्षा अधोरेखित होईल..
भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात
निर्भीड भूमिका मांडली जाईल..
तेव्हा तेव्हा विक्रमकाका…..
तुमची उणीव भासत राहील!!!
आणखी वाचा : BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचेही गोखले मानकरी होते.