सध्या मराठीत एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग यात दाखवला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी ‘आग्र्याहून सुटका’हा महत्त्वपूर्ण कालखंड पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी कशी फत्ते केली हे या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास ५ ऑक्टोबरला रुपेरी पडदयावर झळकण्यास सज्ज झाला आहे. पण त्याआधी प्रदर्शित झालेल्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
आणखी वाचा-अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता
‘शिवप्रताप गरुडझेप’च्या टीझरमध्ये सुरुवातीला औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील दमदार एंट्री होते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उघडून देण्याची धमक आम्ही बाळगतो.” हा त्यांचा संवाद अंगावर अक्षरशः काटा आणतो. अवघ्या १ मिनिटाच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.
दरम्यान जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. चित्रपटात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर अभिनेते यतीन कार्येकर क्रुर मुघल शासक औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.