भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा एकदा उलगडण्यात येत आहे ‘स्टार प्रवाह’वर सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे. फक्त सनातनी हिंदूंनाच जागं करण्यासाठी नव्हे तर त्यावेळच्या सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि दलितांना, शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता.

हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला आणि पुढे पाच वर्ष चालला. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची ही क्रांतिकारक घटना स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या लढ्यात कवी कुसुमाग्रज यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली असं म्हटलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये कवी कुसुमाग्रजांच्या सहभागाचाही संदर्भ दाखवण्यात येईल.

हा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करण्यासाठी सध्या मालिकेची संपूर्ण टीम दिवसरात्र राबतेय. मालिकेतील मुख्य कलाकारांसोबतच जवळपास १५०हून अधिक कलाकारांचा (ज्युनिअर आर्टिस्ट) ताफा या खास चित्रिकरणासाठी बोलवण्यात आलाय. रिअल लोकेशन्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून काळाराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आली असून तो काळ जिवंत करण्याचं शिवधनुष्य स्टार प्रवाह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या संपूर्ण टीमने पेललं आहे.

Story img Loader