ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याने गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळापासून मराठीजनांवर अक्षरश: गारूड केले आहे. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीने गेल्या तीन पिढय़ांमधील तरुणाईच्या भावविश्वात अढळ स्थान प्राप्त केले आहे. त्यानंतरच्या त्यांच्या ‘चांगदेव चतुष्ठय़’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार कादंबऱ्या, ‘देखणी’ व ‘मेलडी’ हे कवितासंग्रह किंवा अगदी अलीकडे आलेली बहुचर्चित ‘हिंदू’ ही कादंबरी असो किंवा त्यांची देशीवादाची मांडणी, वेगवेगळ्या विषयांवर ते करत असलेली शेरेबाजी, मते, भाषणे या साऱ्यांमुळे त्यांचे साहित्य व व्यक्ती म्हणून नेमाडेंविषयीही अनेकांना आकर्षण आहे. मराठी साहित्यात तर नेमाडेंच्या चाहत्यांचा व त्यांच्या समर्थकांचा एक ‘नेमाडेपंथ’च असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा चित्रपटाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मूळ अकलुजच्या असणाऱ्या व सध्या पुण्यात राहत असलेल्या अक्षय इंडीकर या २५ वर्षीय तरुण दिग्दर्शकाने नेमाडेंवर ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा डॉक्यू-फिक्शन स्वरूपातील चित्रपट बनवला आहे. येत्या २७ मे रोजी नेमाडेंच्या वाढदिवशी तो प्रदर्शित होणार असून त्यानिमित्ताने अक्षय इंडीकरशी मारलेल्या गप्पा..
याआधी अक्षयने ‘डोह’ हा लघुपट बनवला आहे. विशीत आलेल्या एका मुलीचा पहिला शारीरिक संबंध हा त्या लघुपटाचा विषय. केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबरोबरच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांत हा लघुपट नावाजला गेला आहे. ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा चित्रपट सुमारे दीड तासाचा असून त्याचे प्रदर्शन येत्या २७ मे रोजी जळगाव येथे होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये, शाळा, सभागृहांमध्ये तो दाखविण्यात येणार आहे.
* ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या चित्रपटाबद्दलच आधी सांग आणि मुळात नेमाडेंवरच चित्रपट बनवावासा का वाटला?
हा चित्रपट म्हणजे भालचंद्र नेमाडे यांच्यासोबतचा प्रवास आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, साहित्य, विचार, तसेच त्यांनी मांडलेला देशीवाद, त्यांची जडणघडण, त्यांच्या साहित्याची, लिहिण्याची सर्जनप्रक्रिया आदींचा मागोवा घेत हा चित्रपट चार भागांत उलगडत जातो. डॉक्यू-फिक्शन स्वरूपाचा हा चित्रपट असून यात त्यांची भाषणे, मुलाखती, त्यांच्यासोबतच्या कारमधील गप्पा यांशिवाय त्यांच्या सहा कादंबऱ्यांमधील प्रसंग आम्ही उभे केले आहेत. त्यामुळे चित्रपटातून समग्र भालचंद्र नेमाडे पाहायला मिळणार असून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य या दोन्हींचा उलगडा त्यातून होणार आहे. अस्तित्ववादी चिंतातुरता, परकेपण, स्थलांतर, त्यांच्या साहित्यातील जिवंत व्यक्तिरेखा अशा विविध थीम घेत साहित्यनिर्मिती करणाऱ्या या अस्सल देशीवादी माणसाला सिनेमातून सलाम करायचं माझ्या मनात आधीपासूनच होतं. या चित्रपटाच्या कल्पनेवर बोलण्यासाठी तसेच त्याची परवानगी घेण्यासाठी त्यांच्याकडे जाताना ते यासाठी परवानगी देतील की नाही याची धाकधूक होती. त्यासाठी त्यांच्याशी काय व कसे बोलायचे याची खूप दिवस तयारीही केली होती; परंतु त्यांनी अगदी तत्काळ होकार दिला. एवढेच नव्हे तर ‘तुझ्याएवढा असताना मी ‘कोसला’ लिहिलीय. त्यामुळे तू व्यवस्थित समजू शकतोस ती भावना..’, अशा शब्दांत मला आत्मविश्वासही दिला.
* मराठीतील डॉक्यू-फिक्शन स्वरूपाचा हा पहिलाच चित्रपट आहे; परंतु डॉक्यू-फिक्शनचे स्वरूप नक्की क से असते आणि हेच स्वरूप का निवडले?
डॉक्यू-फिक्शन म्हणजे प्रत्यक्ष वास्तव माहिती व काल्पनिका (फिक्शन) या दोन्हींचा वापर करत बनलेला सिनेमा. यात माहितीपटाचे फुटेज व फिक्शन यांची सरमिसळ करत विषय उलगडला जातो. नेमाडेंच्या ‘साहित्यिक’ प्रतिमेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण धांडोळा घेण्यासाठी मला चित्रपटाचे हे स्वरूप जवळचे वाटले. ज्यात नेमाडे स्वत: जसेच्या तसे दिसतीलच पण त्यांच्या कादंबऱ्यांमधील पात्रं, त्यातील वातावरणही यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा अध्र्याहून अधिक भाग हा नेमाडेंच्या कोसला पासून हिंदूपर्यंतच्या कादंबऱ्यांनी व्यापलेला आहे. याशिवाय देखणीमधील कविताही यात असणार आहेत. विशेष म्हणजे खुद्द नेमाडे त्या वाचणार आहेत. नेमाडे जागतिक साहित्यात त्यांच्या देशीवादाबद्दल ओळखले जातात. त्यांची देशीवादाची भूमिका त्यांच्या जगण्यात कशी प्रतिबिंबित झाली आहे, हेही यामुळे यात दाखविण्याचा प्रयत्न आहे.
* चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात नेमाडेंशी अनेकदा भेटीगाठी झाल्या असतीलच. त्यांनी या काळात कसे सहकार्य केले? किती वेळ दिला?
आधी म्हटल्याप्रमाणे हा त्यांच्या सोबतचा प्रवास आहे. हा चित्रपट करताना आम्ही त्यांच्यासोबत चाळीस दिवस राहिलो. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नेमाडे सरांनी तीन दिवस देण्याचे कबूल केले होते; परंतु नंतर आम्ही सोबत ३० दिवस चित्रीकरण केले. यात एक मुलाखत तर तब्बल आठ तास सुरू होती. या काळात नेमाडे सरांनी त्यांचे स्वत:चे गावचे घर आम्हाला राहायला खुले करून दिले होते. अक्षरश: ३० दिवस त्यांच्यावर आम्ही आमचा कॅमेरा रोखून ठेवला होता. त्यांनी ते कोणतीच हरकत न घेता आम्हाला करू दिलं. आम्ही त्यांच्या अत्यंत खासगी आयुष्यात डोकावत असतानासुद्धा त्यांनी एका शब्दानेही नकार दिला नाही.
* स्वत: नेमाडे यात दिसणार आहेत. तसेच नेमाडेंचे साहित्य वाचलेल्या वाचकांना व त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटातून काय मिळू शकेल?
नेमाडेंसोबत केलेल्या या प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या साहित्यातील सौंदर्यस्थळे उलगडत गेली आहेत. ही प्रक्रिया अगदी ‘कोसला’च्या हस्तलिखितापर्यंत जाते. त्यांच्या मुलाखतीतून अनेक अनवट प्रश्न नेमाडे आपल्यासमोर सुटे करतात. अगदी त्यांना पडणाऱ्या स्वप्नांनासुद्धा ते व्यक्त करत जातात. अतिशय वेगळ्या विषयांवर त्यांनी येथे गप्पा मारल्या आहेत. त्यात त्यांनी साहित्य व साहित्य बाह्य विषयांवरही मुक्तपणे बोलले आहेत. कोसला कादंबरी तसेच ती जेव्हा आली त्यावेळच्या वातावरणाविषयी तसेच ‘मनू’बद्दलही ते बोलले आहेत. याशिवाय त्यांच्या घराविषयी, त्यांच्या पूर्वजांविषयीही त्यांनी सांगितले आहे.
* चित्रपटाचे चित्रीकरण कुठे झाले आहे? त्याचे काही खास अनुभव..
खानदेश आणि परिसर आमच्या चित्रपटात यावा, तिथले लोकसंगीत, विविध सण नेमाडेंच्या गावात राहून आम्हाला टिपता यावेत यासाठी आम्ही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डोंगर सांगावी या नेमाडेंच्या गावातील घरी जाऊन राहिलो. त्यामुळे येथील ओव्या, गवळण, अभंग, हरिपाठ अशा अनेक मौखिक परंपरा चित्रपटात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय पुणे, मुंबई, भुसावळ, अजिंठा, फर्गसन महाविद्यालय अशा जवळपास १५ ठिकाणी चित्रीकरण केले आहे. यातील बहुतांश वेळा नेमाडे सोबत होते. त्यांच्या कोसला व चतुष्टय़मध्ये अनेक रस्ते येतात. ‘हिंदू’तर संपूर्ण प्रवासातच उलगडत जाते. अशा रस्तांवर प्रवास करून आम्ही चित्रीकरण केले आहे.
* चित्रपटात काम केलेल्या कलाकारांविषयी..
नेमाडेंवर चित्रपट करताना त्यांचं साहित्य जगण्यात अनुभवणारी टीम मला हवी होती. ती आपसूक मिळत गेली. यात संजय मोरे याने नेमाडेंच्या कादंबऱ्यांमधील नायक रंगवले आहेत तर केतकी नारायण या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉडेलने ‘देखणी’ कवितासंग्रहातील स्त्री-व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तर चित्रपटाचे पाश्र्वसंगीत जागतिक स्तरावर सरोदवादक म्हणून नावाजल्या गेलेल्या सारंग कुलकर्णी यांनी केले आहे. ‘देखणी’मधील कवितेला दिलेले संगीत तसेच लोकसंगीताचा वापर करत आध्यात्मिक अनुभूती देणारे संगीत चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे.
प्रसाद हावळे