दीक्षित डाएट प्लॅन सध्या लोकप्रिय झाला आहे. विनाखर्चाची आणि अंमलात आणण्यासाठी अत्यंत सोपी असल्याने ही आहार पद्धती चर्चेचा विषय ठरली. पण मुळात हा डाएट प्लॅन माझ्या आयुष्यात योगायोगाने आला, असं डॉ. दीक्षित सांगतात. झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी डॉ. दीक्षित डाएट प्लॅनबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
डाएट प्लॅनचा योगायोग त्यांच्या आयुष्यात कसा आला याबद्दल ते म्हणाले, ‘२०१२ मध्ये माझं वजन आठ किलोने वाढलं. अपेक्षित वजन ६८ किलो होतं आणि ते ७६ किलोच्या आसपास गेलं. तेव्हा वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. एक दिवस उपवास, एक दिवस फक्त फळं खाल्ली. इंटरनेटवर डाएट प्लॅन शोधून तेसुद्धा फॉलो केले. आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधेसुद्धा घेतली. दर दोन-तीन तासांनी खाण्याचा प्रयोगसुद्धा केला. हे सर्व प्रयोग करतानाच आणखी दोन-तीन किलो वजन वाढल्याचं समजलं. कोणतेच पर्याय कामी येत नव्हते. त्यावेळी एकाने मला डॉ. श्रीकांत जिचकर यांचं व्याख्यान आणून दिलं. त्यात त्यांनी साधा सोपा संदेश दिला होता, पण त्यावेळी मला तो पटला नव्हता. पण म्हटलं एकदा प्रयत्न करून बघूया. निरोगी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल तर दिवसातून फक्त दोनदा जेवा. इतर वेळी फक्त बोलायला आणि पाणी प्यायला तोंड उघडा, असं त्यांनी सांगितलं होतं. फक्त दोनदा जेवा हाच नियम. डोकं बाजूला ठेवून हा प्रयोग करून पाहुया म्हटलं आणि तीन महिन्यांत आठ किलो वजन कमी झालं आणि पोटाचा घेर दोन इंचांनी कमी झाला. जेवढं घडायला हवं होतं ते तीन महिन्यात घडलं आणि तेव्हापासून मी या डाएट प्लॅनकडे ओढला गेलो.’
Video : प्याले रिचवणाऱ्यांच्या ग्लासात डॉ. दीक्षितांनी टाकला मिठाचा खडा
श्रीकांत जिचकार हे या आहार पद्धतीचे आद्य प्रवर्तक आहेत. यात अधिक संशोधन करून आपण ही पद्धती विकसित केल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी यावेळी दिली. ही आहार पद्धती काटेकोरपणे नियंत्रणात आणल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले.