… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याचसोबत डॉ. घाणेकर यांची भूमिका साकारलेल्या सुबोध भावे यांच्या अभिनयाची सर्वच स्तरातून स्तुती करण्यात आली. असाच एक किस्सा खुद्द सुबोध भावे यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. सुबोध भावे यांचे शिक्षक शशिदा इनामदार यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटातील भावे यांच्या अभिनयाची स्तुती केली आहे. ज्यांनी शाळेत आपल्याला शिकवलं,भाषेचे संस्कार केले, अशा आपल्या गुरुजींनी दिलेली ही कौतुकाची थाप आयुष्यभर पुरणारी आहे, अशा भावूक संदेशासह भावे यांनी एक पत्र शेअर केले आहे.

सुबोध भावे यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर यांची साकारलेली भूमिका पाहताना घाणेकर यांचे चाळीस वर्षांपूर्वीचे पाहिलेले चित्रपट, नाटके आणि त्यांची भूमिका आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. तसेच त्यांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला यातून मिळाला असून आभासाची छटा आपल्याला जाणवली असल्याचे सांगत इनामदार यांनी सुबोध भावे यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. अभिनयातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर चित्र उभे करणे ही कलावंताची कसोटी असते आणि ती भावे यांनी उत्तमरित्या पेलल्याचे त्यांनी म्हटले आहे. भावे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या सर्वच भूमिकांचे सोने केले आहे. हे कलासक्त प्रेम आणि अपार मेहनतीचे यश असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर हे आज असते तर त्यांनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करत आपल्यावर कौतुकांचा वर्षाव केला असता, असे म्हणत इनामदार यांनी भावे यांच्या कलागुणांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी भावे यांच्या ‘कळा या लागल्या जीवा’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाची आठवणही जागी केली. यातूनच उत्तम नट अभिनेता ही ओळख त्यांना मिळाली होती. दरम्यान, इनामदार यांनी भावे यांच्या 25 वर्षांच्या कलाप्रवासाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आतापर्यंत भावे यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. परंतु त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळावा, अशी अपेक्षाही इनामदार यांनी व्यक्त केली.

Story img Loader