झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवरही प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचं सर्वोत्तम अभिनय यामुळे मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. या मालिकेच्या सेटला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी आमटे दाम्पत्य ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या संपूर्ण टीमला भेटले.

या सदिच्छा भेटीत दोघांनी सेटवरील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना भेटणं म्हणजे मालिकेच्या कलाकारांसाठी अविस्मरणीय अनुभव होता. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं.. या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय.