रवींद्र पाथरे
मराठी साहित्यात ग्रामीण भागाचं, तिथल्या माणसांचं, संस्कृतीचं, तिथल्या लोकव्यवहाराचं, लोकसंचिताचं चित्रण अनेक लेखकांनी केलेलं आहे. आज तर बहुतांश ग्रामीण लेखक आणि वाचकच मराठी साहित्याचे वाहक झालेले दिसतात. परंतु मराठी रंगभूमीवर मात्र लोकनाट्यं, तमाशा आदी लोककलाप्रकार वगळता मुख्य धारेत ग्रामीण लोकजीवन आणि तिथली संस्कृती चित्रित होताना अभावानंच आढळते. याचं मुख्य कारण व्यावसायिक रंगभूमीचे प्रेक्षक हेच असावं. कारण ते आजवर बहुतांशी शहरी मध्यमवर्र्गीयच राहिलेले आहेत. मुख्य धारा रंगभूमीचा तो जणू नेहमी कणाच राहिलेला आहे. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकार जरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेले असले तरी त्यांना याच साच्यातल्या, याच पठडीतल्या नाटकांतून कामं करावी लागतात ही वस्तुस्थिती आहे. मोजक्याच नाटकांतून अधूनमधून एखादी व्यक्तिरेखा ग्रामीण पार्श्वभूमीची असली तरी तो अपवाद करता नाटक शहरी मध्यमवर्र्गीय प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवूनच बेतलेलं असतं. त्यांची सुखदु:खं, त्यांचं जगणं, त्यांचे मनोव्यापार, त्यांचं रंजन हेच या नाटकांच्या केन्द्रस्थानी असतं. याचा अर्थ ग्रामीण बाजाची, पार्श्वभूमीची नाटकं इथे झालीच नाहीत असं नाही. ‘शितू’, ‘चाकरमानी’, ‘वस्त्रहरण’, ‘येवा कोकण आपलाच आसा’, ‘गारंबीचा बापू’, ‘बॅरिस्टर’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘गुंतता हृदय हे’ अशी नाटकंही या रंगभूमीवर आली आणि गाजलीदेखील. पण त्यांचं प्रमाण फार कमी. अलीकडच्या काळात तर अशी नाटकं दुर्मीळच झालीयत. या पार्श्वभूमीवर ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ हे प्रदीप आडगावकर निवेदित आणि पुरुषोत्तम बेर्डे निर्मित, रंगावृत्तीत, दिग्दर्शित, नेपथ्यित, प्रकाशयोजित, संगीतीत, वेशभूषित (सब कुछ!) नाटक रंगभूमीवर येणं हा सुखद धक्काच म्हणायला हवा. यानिमित्तानं ग्रामीण संस्कृतीच्या गतरम्यतेत काही काळ जाता आलं. ती काही क्षण का होईना, अनुभवता आली. काळाच्या पटावर वेगानं दृष्टिआड होणारं हे विश्व त्या काळात जात पुनश्च जगता आलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा