आधी एकांकिका, त्यावर चित्रपट आणि आता त्यावर आधारित व्यावसायिक रंगभूमीवर नाटक असा योग ‘बीपी’च्या निमित्ताने जुळून आला आहे. भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे ‘बीपी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत असून त्याचा पहिला प्रयोग ८ नोव्हेंबर रोजी सादर होणार आहे. या नाटकात चित्रपटातील ‘विशू’ अर्थात प्रथमेश परब असून या नाटकाच्या निमित्ताने प्रथमेशचे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण होणार आहे.
अंबर हडप लिखित आणि गणेश पंडित दिग्दर्शित ‘बीपी’ही एकांकिका ‘आयएनटी’च्या एकांकिका स्पर्धेत पहिली आली होती. डहाणूकर महाविद्यालयाने सादर केलेल्या या एकांकिकेकडे दिग्दर्शक रवी जाधवचे लक्ष गेले आणि त्याने आपल्या स्वत:च्या शैलीत या एकांकिकेचा ‘बीपी अर्थात बालक पालक’ हा चित्रपट केला. एकांकिकास्पर्धेत ‘बीपी’ गाजली होतीच पण चित्रपटही खूप लोकप्रिय ठरला.
पौगंडावस्थेत मुला-मुलींच्या शरीरात होणारे बदल, लैंगिगतेविषयी पडणारे प्रश्न, भीन्नलिंगी व्यक्तीचे वाटणारे आकर्षण, या सगळ्यात पालकांची भूमिका असे विविध प्रश्न यातून हाताळण्यात आले होते. एकांकिकेचा विषय त्यावेळी खूप चर्चेत राहिला आणि गाजलाही. एकांकिका काही ठरावीक प्रेक्षकांपर्यंतच मर्यादित राहिली होती, पण त्याचा चित्रपट केल्यामुळे हा विषय अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता.
उलटसुलट प्रवास
कथा, कांदबरीवरून मालिका, चित्रपट किंवा नाटक असा योग यापूर्वी जुळून आला आहे. मात्र आधी एकांकिका, त्यावर चित्रपट आणि त्यानंतर नाटक असा योग बहुधा ‘बीपी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच जुळून येणार आहे. या नाटकात प्रथमेश परब आणि त्या एकांकिकेतील मुलांबरोबर ‘बालक पालक’मधील ‘चिऊ’ तसेच सुनील तावडे, समीर चौघुले हे कलाकारही असणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथी दीनानाथ नाटय़गृहात नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे
-प्रसाद कांबळी, भद्रकाली प्रॉडक्शन