रवींद्र पाथरे
आपल्याला सारखं काहीतरी होतंय या भीतीने काही लोकांना नेहमी ग्रासलेलं असतं. डॉक्टरकडे जाऊन औषध घेतलं की त्यांना तात्पुरतं बरंही वाटतं. पण डॉक्टर त्यामागचं खरं कारण जाणून असतात. ही एक मनोरुग्णावस्था असते. मानसोपचाराने त्यातून बाहेर पडता येऊ शकतं. परंतु आपण मनोरुग्ण आहोत हेच मुळी ही मंडळी कबूल करायला राजी नसतात. त्यामुळे त्यावर मानसोपचार घेणं तर दूरच राहतं.

लेखक-दिग्दर्शक संकर्षण कऱ्हाडे यांचं प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित ‘सारखं काहीतरी होतंय!’ हे नाटक वरकरणी याच आजाराबद्दल असल्याचं भासवलं गेलं असलं तरी ते तसं नाहीए. यातल्या केशव करमरकर नामे गृहस्थाला उगीचच आपल्याला सारखं काहीतरी होतंय असं वाटत असतं. त्यात भर पडते ती या गृहस्थाची मुलगी रूपल उच्च शिक्षणासाठी लंडनला जायचं ठरवते तेव्हा! आईविना लाडाकोडात वाढवलेली आपली एकुलती एक मुलगी आपल्यापासून दूर जाणार या धसक्यानेच केशव हतबुद्ध होतो. तिने लंडनला जाऊ नये म्हणून तो तिला परोपरीनं विनवतो. परंतु तिचा निर्धार मात्र कायम असतो. त्यामुळे आता पुढे काय करायचं? पोरगी तर ऐकायला तयार नाही. तिला अडवणंही शक्य नाही. मग एकेकाळी कॉलेजात जिच्यावर केशव मरत असे, पण जिला लग्नाबद्दल विचारण्याचं धाडस मात्र त्याला त्यावेळी झालं नव्हतं अशा इला कानविंदे या रूपगर्विता मैत्रिणीची त्याला अचानक आठवण होते. तिची याकामी मदत घ्यायचं तो ठरवतो. तिने केशवबरोबर कॉलेजच्या नाटकांतून काम केलेलं असतं. केशवने प्रपोज न केल्याने शेवटी ती विक्रांत नावाच्या रुबाबदार, पैसेवाल्या मित्राशी लग्न करून मोकळी होते. परंतु विक्रांतच्या गुलछबूपणाची आपण शिकार झाल्याचं तिला लग्नानंतर लगेचच कळून येतं आणि ती त्याच्याशी घटस्फोट घेते. तिची ही पार्श्वभूमी समजल्यामुळेही केशव तिची मदत घ्यायचं ठरवतो. इलाने ‘डॉक्टर’ बनून आपल्याला गंभीर आजार झाल्याचं रूपलला सांगितलं तर ती आपलं लंडनला जाणं रहित करील अशी त्याला आशा वाटते. इला या ‘नाटका’ला मुळीच राजी होत नाही. रूपलने शिक्षणासाठी लंडनला जाण्यात गैर ते काय, असा उलट सवाल ती केशवला करते. पण यानिमित्ताने केशवशी पुनश्च नातं प्रस्थापित करता येईल.. कदाचित जुनं प्रेम पुन्हा जागवता येईल, या अपेक्षेनं ती नाही नाही म्हणत शेवटी या गोष्टीला होकार देते.
केशव आणि इला हे ‘नाटक’ वठवायचा आपल्या परीने सर्व ते प्रयत्न करतात, परंतु शेवटी ते ‘नाटक’च असल्याने अनेकदा ते फसते आणि दोघंही उघडे पडण्याचे प्रसंग उद्भवतात. केशवचा गंभीर आजार पाहता त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवायला हवं असं डॉ. कांचन भागवत (तथा इला कानिवदे) रूपलला सांगतात, तेव्हा रूपल डॉ. कांचनलाच आपल्या घरी येऊन राहण्याची विनंती करते. केशव या गोष्टीला साफ विरोध करतो. परंतु रूपलच्या हट्टाग्रहाला बळी पडून डॉ. कांचन केशवच्या घरी राहून त्याच्या प्रकृतीवर देखरेख ठेवायला राजी होते. पुढे या सगळ्यातून व्हायचे ते गोंधळ होतातच. आणि..

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

लेखक-दिग्दर्शक संकर्षण कऱ्हाडे यांनी हे नाटक प्रशांत दामले यांना डोळ्यांसमोर ठेवून बेतलेलं आहे. साहजिकपणेच ‘आपल्याला सतत काहीतरी होतंय’ टाईपच्या मनोकायिक आजाराचा येथे दूरान्वयानेदेखील संबंध नाही. ते एक ‘नाटक’ आहे हे एकदा निश्चित झाल्यावर ‘त्या’ आजाराचा फक्त बादरायण संबंध तेवढा जोडलेला आहे. अर्थात प्रेक्षकांची चार घटका निखळ करमणूक करणं या विशुद्ध हेतूनेच प्रशांत दामले नाटकं पेश करीत असल्याने त्यांच्या नाटकात कथाबीजाला फारसं महत्त्व नसतंच. ते त्यांच्या पद्धतीने (आणि चोखपणे!) आपलं नाटक प्रेक्षकांची शंभर टक्के करमणूक करील याबद्दलची हमी देतात (अर्थात प्रेक्षकही त्यांच्यावर विश्वास ठेवतात!) आणि ते ती दोनशे टक्के पूर्णही करतात. त्यांच्या नेहमीच्या पठडीतलंच हेही नाटक आहे. साहजिकच विनोदासाठी चित्रविचित्र पात्रांची भरमार त्यात आपसूक आलीच. यात अम्मा नावाची अत्यंत आगाऊ, सतत बडबड करणारी घरकामवाली आणि नट होण्याचा किडा चावलेला विक्रांत (ऊर्फ इलाचा नोकर) अशी साच्यातली अर्कचित्रंही लेखकाने योजली आहेत. बाकी मग प्रशांत दामले आपल्या नित्याच्या उत्स्फूर्त उत्साहाने रंगमंचावर सतत हास्याचे धबधबे फुटत राहतील याची खबरदारी घेतातच. आणि खोटय़ा ‘नाटका’त तर याला प्रचंड वाव असतोच. वर्षां उसगावकर आणि प्रशांत दामले ही जोडीही खूप वर्षांनी या नाटकात एकत्र आली आहे, हीसुद्धा या नाटकाची खासियत म्हणता येईल.

प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचं नेपथ्य केलं आहे. त्यात केशवच्या घरातील त्याच्या दिवंगत पत्नीचा हावभावांसहचा फोटो समोरच्या भिंतीवर लावला आहे. प्रत्येक प्रवेशानुरूप तिच्या हावभावांत बदल होत जातात. मात्र, दिग्दर्शकाने ते ठाशीवपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. अन्य तांत्रिक बाबी यथायोग्य!

प्रशांत दामले यांनी केशवच्या भूमिकेत आपले हुकमी रंगढंग ओतून ती धम्माल साकारली आहे. एक मात्र नमूद करायला हवं की, आपली मैत्रीण इला हिला केशवने आपल्या ‘नाटका’त सहभागी करून घेतलं असलं तरी तिच्याशी पूर्वीच्या रोमॅन्टिक संबंधांचा फायदा घेऊन जवळीक साधण्याचा तो जराही प्रयत्न करीत नाही. किंबहुना, रूपलला लंडनला जाण्यापासून रोखण्याच्या आपल्या ईप्सितापुरतंच तो तिच्या-आपल्यातलं अंतर कायम राखतो. अन्यथा नाटक आणखीनच भरकटलं असतं. प्रशांत दामलेंनी दाखवलेला हा संयम वाखाणण्याजोगा आहे. वर्षां उसगावकर यांनी केशवच्या ‘नाटका’त सहभागी झालेल्या डॉ. कांचन भागवतचं अवघडलेपण आणि कृतकता योग्य तऱ्हेनं दाखवली आहे. पौर्णिमा केंडे-अहिरे यांची बोलघेवडी अम्मा आपल्या वाटय़ाचे हशे बिलकूल वसूल करते. विक्रांत तथा इलाचा नोकर झालेल्या राजसिंह देशमुखांचं अज्ञानातून इंग्रजी फाडणं गंमत आणतं. त्यांचा कमालीचा अगोचरपणा हशे पिकवतो. सिद्धी घैसास यांची रूपलही ठीक.

प्रशांत दामलेंचं नाटक पाहायला जाताना जो हेतू मनी ठेवून प्रेक्षक येतात तो हेतू चोख पुरा होत असल्याने हे ‘पैसेवसूल’ नाटक आहे असं म्हणायला प्रत्यवाय नाही.