नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये माझ्या अभिनयाची जडणघडण झाली आहे. त्यानंतरही मी अनेक नाटकांमधून कामे केली. कालांतराने चित्रपट आणि नंतर दूरचित्रवाणी या माध्यमांमध्ये मी रूळले असले, तरीही रंगभूमी हे आजही पहिले प्रेम आहे, अशी भावना रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केली. मिराह एण्टरटेन्मेण्टच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाद्वारे रोहिणीताई आता २२ वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनपदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ता’शी गप्पा मारल्या.
गेल्या काही वर्षांत आपण काही मराठी चित्रपट केले होते. मात्र ते चित्रपट मुंबई परिसरात कधीच प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे आपण केवळ तांत्रिकदृष्टय़ा २२ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीपासून लांब होतो, असेही त्यांनी सांगितले. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाचा विषय आपल्याला आवडला. त्याचप्रमाणे सतीश राजवाडेसारख्या संवेदनशील दिग्दर्शकासह काम करण्याचीही इच्छा होती. अतुल कुलकर्णी वगैरे कलाकारांचा संचही खूपच कसदार आहे. त्यामुळे आपण हा चित्रपट स्वीकारल्याचे रोहिणीताईंनी स्पष्ट केले.
चित्रपट, मालिका वगैरे करत असलो, तरी आपले पहिले प्रेम रंगभूमीच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. आपण रंगभूमीवरच घडलो आहोत. गेल्या वर्षी आपण ‘जगदंबा’ नावाचे नाटक केले होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सध्या त्याचे प्रयोग सुरू नाहीत. पण लवकरच ते नाटक पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे, असे रोहिणीताई म्हणाल्या. आजकाल मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्यांना डोळ्यासमोर ठेवून भूमिका लिहिल्या जात आहेत. मात्र आपल्याला आतापर्यंत तरी अशा आव्हानात्मक भूमिकेबद्दल विचारणा झाली नाही. अशा चित्रपटासाठी विचारणा झाली, तर आपण नक्कीच तसा चित्रपट सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader