यंदा विविध स्पर्धामध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या ‘प्रपोझल’ या नाटकाने २५व्या महाराष्ट्र राज्य अंतिम मराठी व्यावसायिक नाटय़ स्पर्धेतही बाजी मारली. रंगमंच, रंगनील या संस्थेच्या या नाटकाने पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवले. या नाटकाचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे, नेपथ्यकार व प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये, वेशभूषाकार गीता गोडबोले, संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांनाही प्रथम पारितोषिक जाहीर झाले. अश्वमी थिएटर्स व अद्वैत थिएटर्स संस्थेच्या ‘टॉम आणि जेरी’ या नाटकाला तीन लाख रुपयांचे द्वितीय आणि आशय प्रॉडक्शनच्या ‘सुखान्त’ नाटकाला दोन लाखांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले.
उत्कृष्ट अभिनयासाठीचे रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख पारितोषिक यंदा मोहन जोशी (सुखान्त), मंगेश कदम (लहानपण देगा देवा), डॉ. अमोल कोल्हे (प्रपोझल), प्रसाद ओक (बेचकी) आणि निखिल रत्नपारखी (टॉम आणि जेरी) या अभिनेत्यांना आणि अदिती सारंगधर (प्रपोझल), नेहा जोशी (बेचकी), नंदिता धुरी (सुखान्त), कादंबरी कदम (टॉम आणि जेरी) आणि सुकन्या कुलकर्णी (फॅमिली ड्रामा) या अभिनेत्रींना जाहीर झाले. ३ ते १० एप्रिल दरम्यान गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेसाठी विश्वास मेहेंदळे, मदन गडकरी, फैय्याज, राजन बने, अदिती देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा