‘दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नाटय़प्रशिक्षण घेण्याअगोदर शाळेत शिकत असतानाही मी नाटक करत होते. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याहूनही चांगले काहीतरी यात आहे, हे माझ्या वडिलांमुळे मला समजले. माझे गुरू इब्राहिम अल्काझी यांच्याकडून नाटकाचे विविधांगी, सखोल शिक्षण मला मिळाले. त्यामुळे कूपमंडुक वृत्ती सुटली आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी आपल्याला लोकांसमोर धीटपणे बोलता आले पाहिजे. हा आत्मविश्वास नाटय़प्रशिक्षणातून मिळतो,’ असे मत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले. ‘आविष्कार’ संस्थेतर्फे आयोजित ‘नाटय़प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील मुक्तचर्चेत रोहिणी हट्टंगडी व चिन्मय मांडलेकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी उपस्थितांना मिळाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘माझ्या नाटय़प्रशिक्षणाची सुरुवात ज्या वास्तूमधून झाली, तिथेच आज पुन्हा येऊन मला नाटय़प्रशिक्षणावर बोलायला मिळतंय, हा एक सुखद योगायोग आहे. ‘आविष्कार’मध्ये विनय पेशवे यांच्या एकवर्षीय कार्यशाळेत घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा मला दिल्लीत एनएसडीत शिकताना तसेच पुढील आयुष्यातही झाला. सर्वानाच एनएसडीत नाटय़प्रशिक्षण घेणे शक्य नसते. पण एनएसडी हे असे एक जग आहे, की जिथे मला समृद्ध दृष्टी लाभली,’ असे उद्गार अभिनेते, लेखक व दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी काढले.
‘सध्या नाटय़प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था फोफावत आहेत. परंतु त्यांच्या योग्य-अयोग्यतेबद्दल अनुभवी लोकांकडून शहानिशा करून घेऊन गुणवत्ताधारक संस्थांच्याच शिबिरांतून नाटय़प्रशिक्षण घेतले पाहिजे. शिबिरातील मार्गदर्शक फक्त आपले या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहेत, की प्रत्यक्ष नाटय़प्रशिक्षण देणार आहेत, याचीही खातरजमा प्रवेशाआधी करून घेतली पाहिजे. शाळा-शाळांतून नृत्य, नाटय़, संगीत या कलांचे ज्ञान देणाऱ्या तासिका असल्या पाहिजेत. पालकांनी व शिक्षकांनी असे कलाशिक्षण घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची विचार करण्याची दृष्टी बदलते. आपोआपच समृद्धतेकडे वाटचाल सुरू होते. शिबिरात येणाऱ्या प्रत्येकाला फक्त अभिनयच शिकायचा असतो. पण अभिनयापेक्षाही इतर कोणत्या गोष्टी आपण चांगल्या करू शकतो, हे नाटय़प्रशिक्षणातून समजून येते. सध्या पालकांना व मुलांना सगळं काही झटपट हवं असतं. ही बाब निश्चितच चुकीची आहे. त्यामुळे कलेबद्दलचा व्यापक व सखोल दृष्टिकोन प्राप्त होत नाही,’ असे निरीक्षण रोहिणी हट्टंगडी व चिन्मय मांडलेकर यांनी नोंदविले.