‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’सारखे वेगळे चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी झाले आणि विद्या बालनचे नाव बॉलीवूडची ‘हिरो’ म्हणून घेतले जाऊ लागले. त्याच्यामागचं कारणही महत्त्वाचं होतं. गेली कित्येक वर्षे हिरोची नायिका म्हणून पडद्यावर फक्त ग्लॅमरसपणे वावरणे एवढाच हिरोइनचा अर्थ मर्यादित झाला होता. विद्याच्या चित्रपटांनी हे समीकरण अशा पद्धतीने मोडून काढलं की खास तिच्यासाठी भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या. तोच कित्ता मग दीपिकाने व्यावसायिक चित्रपटांसाठी अवलंबला. विद्याला मात्र हे यश पूर्णपणे तिला मिळालेले चित्रपट, त्यांचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांचे होते असे वाटते. ‘बॉबी जासूस’च्या निमित्ताने आपल्या पूर्णपणे वेगवेगळ्या अवतारांविषयी बोलण्याआधीही अभिनेत्री म्हणून कारकिर्दीच्या या टप्प्यावर मिळालेले यश हे आपल्याला मिळालेल्या चित्रपटांचं होतं असं विद्याने ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितलं.
माझ्याकडे आलेल्या चित्रपटांच्या कथाच जबरदस्त होत्या. त्याशिवाय सुजॉय घोष, मिलन लुथारिया यांसारखे उत्कृष्ट दिग्दर्शक होते. मी फक्त ते बोल्ड आणि वेगळ्या विषयांवरचे चित्रपट करण्याचं धाडस केलं, आणि म्हणूनच लोकांनाही ते आवडले असावेत, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटते, असे ती म्हणते.
आताही बॉबी जासूसचे उदाहरण घे. साहिल आणि दिया ज्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक यांना घेऊन बॉबी जासूसची कथा ऐकवायला आले त्या वेळी मला हेच वाटलं होतं की फारतर करमचंदची सेक्रेटरी अशीच एखादी भूमिका मला करायची असेल. मात्र दियाने तुला जासूसची- गुप्तहेराची- भूमिका करायची आहे, असं सांगितलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला, असं म्हणणारी विद्या आपल्याला चित्रपटातील जासूसी कारवायांपेक्षाही बॉबीची व्यक्तिरेखा जास्त आवडल्याचं सांगते. बॉबी जासूस हा चित्रपट हैदराबादमधील एका तरुणीची कथा आहे. या तरुणीला गुप्तहेर बनायची इच्छा आहे आणि ती त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करते. बॉबीची व्यक्तिरेखा ही कुठेतरी वास्तवात आपल्याशी साधम्र्य राखणारी आहे असं विद्याला वाटतं. मी जेव्हा चित्रपटसृष्टीत आले तेव्हा माझ्याही कुटुंबात फिल्मशी रिलेटेड कुणीही व्यक्ती नव्हती. मी फारच सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी असल्याने चित्रपटांचं जग काय याची मला सुतराम कल्पना नव्हती. पण मी स्वत: फार मेहनतीने मी माझी कारकीर्द घडवलीय, असं ती सांगते.
तुला बॉलीवूडची ‘हिरो’ म्हणून संबोधलं जातं तेव्हा तुझ्या मनात काय विचार येतो, असं विचारल्यावर मला खूप अभिमान वाटतो. पण मला हिरो बनायचं नाही, मी अभिनेत्री म्हणूनच आनंदित आहे, असं ती हसत हसत सांगते. त्यातही गंमत अशी आहे की, मला कधी ना कधीतरी पडद्यावर हिरो बनायची खूप इच्छा होती. श्रीदेवीने मिस्टर इंडियामध्ये चार्ली चॅप्लिनची छोटीशी भूमिका केली होती. संधी मिळेल तेव्हा अशी भूमिका करायचीच असं मी ठरवलं होतं. बॉबी जासूसमुळे हिरो किंवा खऱ्या अर्थाने पुरुष साकारायची माझी इच्छा पूर्ण झाली, असे तिने सांगितले. बॉबी जासूसचा फर्स्ट लूक जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा भिकाऱ्याच्या वेशातील विद्याचे छायाचित्र कोणालाही ओळखता आले नव्हते. एवढं म्हटल्यावर तिची कळी आनंदाने खुलली. एवढेच काय माझ्या आईवडिलांनाही ते छायाचित्र पाहून माझी ओळख पटली नव्हती, असं ती सांगते. बॉबी जासूसमधील सहाही लूक्स तिचे मेकअपमन आणि स्टायलिस्ट या दोघांनी इतक्या अप्रतिमपणे केले की प्रत्येक लूकनंतर मला कुणीही ओळखत नसायचं. एकदा तर लाइटमेनच्या मागे जाऊन उभी राहिले तरी त्याने काम करताना मागे वळून पाहिले आणि मध्येच कुणीतरी उभे आहे म्हणून तिथून हटविण्याचा प्रयत्नही केला. क्षणभर माझ्याकडे रोखून पाहिल्यानंतर आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव मी कधीच विसरू शकणार नाही, असे विद्या म्हणते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा