सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचे दागिने घरातून चोरीला गेले होते. यासंदर्भात ऐश्वर्याने चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेतली होती. ऐश्वर्याने तिच्या चेन्नईच्या घरातील सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी मंगळवारी २१ मार्च रोजी ऐश्वर्याची मोलकरीण आणि ड्रायव्हरला अटक केली. त्यांनीच घरातून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याच्या ड्रायव्हरचे नाव वेंकटेशन आहे, त्याच्या सांगण्यावरून मोलकरीण ईश्वरीने सुमारे १०० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३० ग्रॅम हिऱ्याचे दागिने तसेच चार किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरले होते. महिलेने सर्व दागिने विकून त्यातून मिळालेले पैसे घर खरेदीसाठी वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.
ईश्वरी १८ वर्षांपासून ऐश्वर्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यामुळे तिला घराबद्दल संपूर्ण माहिती होती. यापूर्वी अनेकदा तिने चोरीचा प्रयत्न केला होता, कारण तिला लॉकरची चावी कुठे ठेवली जाते, ते माहीत होतं, असं पोलिसांनी सांगितलं. मोलकरणीने चोरी करून घर खरेदी केलं. या खरेदीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.