या चित्रपटाची गोष्ट एकदम सरळसाधी, नेहमी आपल्या अवतीभवती घडणारी आहे. हरिद्वार येथे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात घडणारे कथानक आहे. तिवारी नावाचे कुटुंब, त्यातला प्रेम तिवारी हा मॅट्रिकही पास होऊ न शकलेला तरुण. त्याच्या वडिलांचे कॅसेट विक्रीचे दुकान हरिद्वारच्या बाजारपेठेत आहे. सीडीचा जमाना यायला थोडा अवकाश होता त्या काळातले कॅसेटचे दुकान, त्यातल्या मिळकतीवर तिवारी हे मध्यमवर्गीय कुटुंब चालले आहे. आधीच अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलावर वडील जसे कायम करवादतात तशीच अवस्था प्रेमची आहे. त्यामुळे घरात त्याच्या मताला फारशी किंमत कुणी देत नाही. वडील म्हणतात म्हणून त्याला लग्न करावे लागते एका जाडय़ा मुलीसोबत. हिंदी चित्रपटांची गाणी, रूपेरी पडद्यावरील तरुणाईला नेहमीच हवेहवेसे वाटते. त्याप्रमाणेच प्रेम तिवारीची मनीषा असते. परंतु त्याचे लग्न संध्या वर्मा या जाडजूड तरुणीशी होते.
जाडजूड तरुणीशी लग्न केले म्हणून प्रेम उद्विग्न होतो, खट्टू होतो. त्याचे स्वप्नवत भावविश्व उद्ध्वस्त झाले असे त्याला वाटते. याउलट संध्याला आपण जाडजूड आहोत याची जाणीव असते. प्रेम तिवारीला पाहिल्यावर संध्या लग्नाला तयार होते. जाडजूड तरुणीचा नवरा अशी प्रतिमा घेऊन प्रेम तिवारी लग्न लावून घरी परततो आणि त्याचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू होते.
लेखक-दिग्दर्शकाने उत्तर भारतातील निमशहरी मध्यमवर्गीय कुटुंबांचे प्रातिनिधिक चित्रण, त्यातील आई-मुलगा-वडील-आत्या, बहीण-भाऊ यांच्या नात्यांतले ताणेबाणे, वडीलधार्जिणी कुटुंब पद्धती, प्रत्येक गोष्टीचा संबंध आर्थिक कुवतीशी जोडण्याचा मध्यमवर्गीय कुटुंबांचा स्वभाव यांसारखे मध्यमवर्गीय लोकांचे बारकावे छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून टिपले आहेत.
केवळ दाखवायलाच आधुनिक म्हणता येईल असे कुटुंब परंतु जुने संस्कार, परंपरा यांचा प्रचंड पगडा कुटुंबावर पर्यायाने समाजावर आहे याचे उत्तम चित्रण चित्रपटात केले आहे. प्रेम तिवारी आपल्या कॅसेटच्या दुकानात बसून सतत गाणी ऐकत असतो. कुमार सानूचा तो प्रचंड चाहता आहे. प्रेम तिवारी-संध्या वर्मा यांचे भांडण होते तेव्हा ते भांडण दिग्दर्शकाने एकमेकांच्या आवडीची गाणी लावण्याच्या अहमहमिकेद्वारे दाखवून धमाल केली आहे. वर्मा कुटुंबातील संध्या बी. एड. शिकलेली आहे. तिच्या घरात ती स्वत:च्या मनाप्रमाणे वागते याऊलट तिवारी कुटुंबाच्या घरात प्रेमचे काहीच चालत नाही, कारण तो शिकलेला नाही, काही पैसे स्वत: कमावून आणत नाही म्हणून त्याला काहीच किंमत नाही आणि तरी संध्या-प्रेमशी लग्न करते. लग्न झाले की तरुण-तरुणी आयुष्यात स्थिरस्थावर होतात, मार्गाला लागतात हा समाजाचा जुनाट विचार अजूनही कायम आहे हे अतिशय मार्मिकपणे दाखवीत दिग्दर्शकाने एकप्रकारे त्यावर संयत स्वरूपाची टीका केली आहे.
कलावंतांची निवड हे या चित्रपटाचे बलस्थान निश्चितच आहे. आयुषमान खुरानाने साकारलेला प्रेम तिवारी आणि नवोदित अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने साकारलेली संध्या वर्मा यांची जोडी उत्तम जमली आहे. संजय मिश्रा, सीमा पाहवा या चरित्र कलावंतांनी आपल्या अभिनयाची उत्तम साथ दिग्दर्शकाला दिली आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाप्रमाणे भिडणारा विषय दिग्दर्शकाने हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे हे या चित्रपटाचे यश आहे.
चित्रपटाच्या गाभ्याला कुठेही धक्का लागू न देता संगीताची रचना संगीतकाराने केली असून ‘मोह मोह के धागे’ या श्रवणीय गाण्यातून कथानकाचा सारांश सांगण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे.
दम लगा के हैश्शा
निर्माते – आदित्य चोप्रा, मनीष शर्मा
लेखक-दिग्दर्शक – शरत कटारिया
संगीत – अनु मलिक
कलावंत – आयुषमान खुराना, भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, अलका अमीन, सीमा पाहवा, शीबा चढ्ढा व अन्य.
सुनील नांदगावकर -sunil.nandgaokar@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा