कारगिल युद्धाच्या वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत एक किस्सा घडला होता. रवीनाचे नाव लिहिलेला एक बॉम्ब पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान नवाब शरीफ यांना पाठवण्यात आला होता. यावर आता रवीनाने प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटरवर लाइव्ह चॅट दरम्यान रवीनाला एका यूजरने या घटनेबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर रवीनाने उत्तर देत याबाबत तिला फार उशिरा माहिती मिळाली होती असे सांगितले. ‘एखाद्या आईला तिच्या मुलांना गमावल्यानंतर आनंद होत नाही. कारण बॉर्डच्या दोन्ही बाजूला देशातील लोकांचे रक्त वाहते’ असे रवीना म्हणाली.
अल्लू अर्जुन ते महेश बाबू; जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार्सचे मानधन
रवीना ही नवाज शरीफची अतिशय आवडती बॉलिवूड अभिनेत्री होती. त्यामुळे कारगिल युद्धाच्या वेळी काही सैनिकांनी अभिनेत्रीचे नाव लिहिलेला एक बॉम्ब त्यांना गिफ्ट म्हणून दिला होता. बऱ्याचदा सोशल मीडियावर या बॉम्बचा फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या बॉम्बवर ‘रवीना टंडनकडून नवाज शरीफ यांना’ असे लिहिण्यात आल्याचे दिसते. त्यासोबतच हार्ट काढण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी रवीनाची ‘आरण्यक’ ही सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केले. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच फिल्म क्रिटिक्सकडून देखील तारीफ झाली होती.