बॉलिवूडमधील ‘बॉयकॉट’ वाद एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललाय तर दुसरीकडे ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. एस एस राजामौली यांचा चित्रपट RRR ऑस्करला जावा अशी इच्छा अनुराग कश्यपने व्यक्त केल्यानंतर ‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर संताप व्यक्त केला होता. ‘द कश्मीर फाईल्स’ ऑस्करला जाऊ नये यासाठी बॉलिवूडमधील एका गटाने मोहीम सुरू केल्याचं म्हटलं होतं. आता एका कॅनडामधील दिग्दर्शकाने ‘द कश्मीर फाईल्स’बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपच्या ट्वीटवर विवेक अग्निहोत्री यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्यानंतर कॅनडाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी अनुराग कश्यपला समर्थन देत एक ट्वीट केलं होतं. विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट रिट्वीट करत त्यांनी म्हटलंय, “हो कारण ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट केवळ तिरस्कार पसरवतो. कलात्मकतेच्या नावाखाली हा सगळा कचरा आहे. जर हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला तर त्यामुळे भारताचा अपमान होईल. अनुराग कश्यप केवळ या सगळ्यापासून देशाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.” दरम्यान काही वेळाने त्यांनी आपलं ट्वीट डिलीट केलं. मात्र याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा- दारुच्या नशेत करण- आलियाने विकी कौशलला केला होता कॉल, वाचा नेमकं काय घडलं
काही दिवसांपूर्वीच अनुराग कश्यपच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये अनुरागने RRR चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. अनुरागच्या मते यावर्षी जर भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून जर RRR या चित्रपटाला पाठवलं तर त्याला ९९% नामांकन मिळू शकतं. शिवाय ज्यापद्धतीने भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाहिलं आहे त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या दृष्टीकोनातून परदेशी लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे असं अनुरागचं मत आहे. त्याच्या या वक्तव्यावरच सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.
आणखी वाचा- ‘द कश्मीर फाईल्स’ला ऑस्करपासून दूर लोटायचा बॉलिवूडचा डाव : विवेक अग्निहोत्री अनुराग कश्यपवर भडकले
विवेक अग्निहोत्री यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉट घेत ट्विट केलं आहे. “काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारणाऱ्या लोकांच्या टोळीने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाऊ नये, म्हणून अनुराग कश्यपच्या नेतृत्वाखाली त्यांची मोहीम सुरू केली आहे.” असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय तसेच त्यांनी अनुरागच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’चाही उल्लेख केला आहे.