कलाकारांची भावना
‘जय मल्हार’ला मिळालेले यश हे संपुर्ण ‘टीम’चे आहे. मालिकेने आपला ‘टीआरपी’ टिकवून ठेवला असून सर्वोच्च स्थान अबाधित राखले आहे. हे यश असेच अखंड रहावे यासाठी प्रयत्न सुरू राहतील. मालिकेतील प्रत्येक पात्राने कलाकार म्हणून जनसामान्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशी भावना झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जय मल्हार’च्या कलाकारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
जेजुरीचे अधिपती श्री खंडेरायांच्या चरित्रावर आधारित ‘जय मल्हार’ ही मालिका सध्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चर्चेत आहे. मालिकेने २०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. जेजुरीशी खंडेरायाचा असणारा संबंध सर्वश्रृत असला तरी नगर जिल्ह्य़ातील रहाता तालुक्यातील ‘वाकडी’ गावाला पुराणात असणारे महत्व याकडे मालिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. सारीपाटाच्या डावात हरलेले खंडेराय आपल्या शिवत्वाचा त्याग करून जेजुरीचे राज्य म्हाळसेला देऊन वनात जाण्याचा ‘पण’ घेतात. संसाराचा त्याग केल्यानंतर खंडेराय बानाईला भेटतील या भीतीने एकिकडे म्हाळसा खुप चिंताक्रांत होते. त्यांच्यामार्फत खंडेरायांच्या वाटेत विघ्न आणले जाते. दुसरीकडे, खंडेरायाचे सैन्य आपला राजा आपल्या सोडून जातोय या भावनेने त्यांच्या सोबतीने निघते. हे सैन्य आणि खंडेराय ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्यावेळी खंडेराय त्यांना जेजूरीला जाण्याचे सांगतात. मात्र सैनिक त्या आदेशाचे पालन करण्यास नकार देतात. अशावेळी खंडेराय चमत्काराने त्या सैन्याच्या माना जेजुरीच्या दिशेने वळवतात आणि सैन्य जेजुरीकडे परत फिरते. या माना ज्या ठिकाणी वाकडय़ा झाल्या, त्या गावाला ‘वाकडी’ हे नाव पडले असे मालिकेचे पटकथा लेखक संतोष आयाचित यांनी सांगितले. खंडेरायांचे लोकचरित्र विविध ग्रंथात विखुरलेले आहे. ते एकसुत्र बांधण्याचा प्रयत्न मालिकेच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये भाषेचा पूर्वाश्रमीचा लहेजा टिकून रहावा यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे आयाचित यांनी नमूद केले.
मालिकेविषयी ईशा केसरकर (बानाई), सुरभी हांडे (म्हाळसा), नकुल घाणेकर (हेगडी प्रधान), पूर्वा सुभाष (लक्ष्मी), देवदत्त नागे (खंडेराय) यांनी सांगितले. मालिका पौराणिक असली तरी सुरूवातीपासून प्रेक्षकांच्या अभिरूचीची पकड घेतली आहे. ही भूमिका साकारतांना आम्हाला आम्ही दैवत्वाचा अंश असल्याचा भास होतो. त्यातून त्याच दर्जाचा अभिनय होतो, उत्तम निर्मिती मूल्यामुळे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आजवरचा प्रवास सुखकर झाला झाल्याचे त्यांनी सांगितले. या मालिकेमुळे खंडेराया व्यतिरीक्त बानाई, हेगडी प्रधान हे लोकांसमोर आले. आज हेगडी प्रधान, बानाईच्या मंदिराला झळाळी प्राप्त झाली आहे.
मालिकेच्या प्रत्येक भागात सतत काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी अभ्यास केला जातो. वेशभुषेपासुन सादरीकरणापर्यंत दर्जेदार देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मालिकेचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितले.
‘जय मल्हार..’ने खुप काही दिले
‘जय मल्हार’मध्ये खंडेरायाची भूमिका साकारतांना वेगवेगळ्या अनुभूती येत गेल्या. भावनिक द्वंद सुरू झाल्यावर जेजुरीला चक्कर मारतो आणि मनसोक्त रडुन सकाळी सेटवर हजर राहतो. मालिकेतील माझा अभिनय पाहता खुप चांगल्या संधी मला मिळाल्या. त्यात संजय लीला भन्साळी यांच्याकडून ‘बाजीराव मस्तानी ’मध्ये दोन वेगवेगळ्या पात्रांसाठी विचारणा करण्यात आली. ‘जय मल्हार’ने खुप काही दिले असतांना ते काम पूर्ण होईपर्यंत दुसरे काही करायचे नाही असे आपण ठरवले आहे.
देवदत्त नागे