पनामा पेपर लिकप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आज (२० डिसेंबर) तब्बल ५ तास ईडी चौकशी झाली. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही चौकशी करण्यात आली. ईडीने ऐश्वर्याला या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर ऐश्वर्या स्वतः चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाली होती. या ठिकाणीच तिची चौकशी झाली. यावेळी ऐश्वर्यांला ईडीच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला.
बच्चन कुटुंबावर नेमके काय आरोप?
अमिताभ बच्चन ४ कंपन्यांचे संचालक आहेत. यातील ३ कंपनी बहामासमध्ये, तर एक कंपनी व्हर्जिन आयलँडमध्ये आहे. या कंपन्यांचे भागभांडवल ५ ते ५० हजार डॉलर्स इतके आहे. या कंपन्यांमार्फत कोट्यावधी रुपयांच्या जहाजांचा व्यवहार झाला. ऐश्वर्याची आधी यापैकीच एका कंपनीच्या संचालकपदी नेमणूक झाली. यानंतर ऐश्वर्याला भागधारक म्हणून घोषित करण्यात आलं. यापैकी एक कंपनी अमिक पार्टनर्स या कंपनीचं मुख्यालय व्हर्जिन आयलँडमध्ये आहे. ऐश्वर्याचे आई-वडील आणि भाऊ या कंपनीत भागीदार होते.
पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्याला ईडीकडून समन्स
पनामा पेपर्स लीक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. ऐश्वर्या राय बच्चनला दोनदा फोन करण्यात आला होता. मात्र त्या दोन्ही वेळेला तिने नोटीस पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. तिची ही विनंती त्यावेळी मान्य करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातंर्गत ऐश्वर्याला समन्स बजावले आहे.
हे समन्स गेल्या ९ नोव्हेंबरला बच्चन कुटुंबियांच्या प्रतिक्षा या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर पुढील १५ दिवसात उत्तर द्यावे, असेही नमूद करण्यात आले होते. ऐश्वर्याने ईडीला ईमेलद्वारे उत्तर दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या चौकशी कमिटीमध्ये ईडी, आयकर आणि इतर एजन्सींचा समावेश आहे.
पनामा पेपर प्रकरण काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित माध्यम संस्थांनी व्यापक आर्थिक गैरव्यवहारांवर शोध पत्रकारिता करण्यासाठी जागतिक शोध पत्रकार समूहाची स्थापना केली. या जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस या माध्यम संस्थेचाही समावेश आहे. हाच समूह पनामा पेपरवर अभ्यास करत आहे.
हेही वाचा : ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या रडारावर, चौकशीसाठी बजावले समन्स
हा समूह ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) आणि इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) या दोन प्रकल्पांवर काम करत आहे. यात पत्रकारांच्या शोध मोहीमेतून धक्कादायक माहिती समोर आली. पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीचे काही पेपर लीक झाले होते. हा डेटा एका जर्मन न्यूजपेपरने पनामा पेपरच्या नावाने ३ एप्रिल २०१६मध्ये रिलिज केला होता. यामध्ये भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात आला होता.
पनामा पेपरमध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश?
या यादीमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. त्यात बच्चन कुटुंबीतील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा देखील समावेश असल्याचे म्हटले जाते.