आंतरराष्ट्रीय संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक एड शीरनचे भारतातही लाखो चाहते आहेत. त्याच्या अनेक गाण्यांवर भारतीय तरुणाई थिरकते. एड शीरनची गाणी आणि त्याचे सूर थेट काळजाला स्पर्श करतात. सध्या एड शीरन भारत दौऱ्यावर आहे. विविध शहरांत त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात त्याच्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थेट भारतीय संगीत विश्वातील दिग्गज एआर रहमान यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकताच एड शीरनचा लाइव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम चेन्नईत पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येनं चाहते त्याला ऐकण्यासाठी आले होते. तितक्यात प्रेक्षकांना आणखी एक सुखद धक्का मिळाला. या कार्यक्रमात थेट एआर रहमान यांनी एन्ट्री घेतली. कार्यक्रमात ते दाखल होताच उपस्थित प्रेक्षकांना खूप आनंदित झाले आणि सर्व जण उत्साहाने ओरडू लागले.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एड शीरन लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सर्वांना एआर रहमान यांचं आगमन झाल्याचं सांगतो. त्यावर प्रेक्षक आनंद व्यक्त करतात. प्रेक्षकांचा आनंद आणखी वाढविण्यासाठी पुढे दोन्ही गायक एकत्र गाणी गातात. मंचावर आल्यावर क्षणाचाही विलंब न करता एआर रहमान थेट १९९४ मधलं ‘कधलन’ या चित्रपटातील ‘उर्वशी उर्वशी’ हे गाणं गाण्यास सुरुवात करतात.
एआर रहमान हे गाणं गात असताना एड शीरनसुद्धा गाणं गाऊ लागतो. तो ‘शेप ऑफ यू’ हे गाणं गाऊ लागतो. दोन्ही गायकांचे मॅशअप एकाच वेळी एकाच मंचावर तेही प्रत्यक्षात ऐकायला मिळाल्याने चाहते आणखी जास्त भारावून जाऊन, आनंदी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ एड शीरननं स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये एड शीरनने “किती आदर आहे”, असे लिहिलं आहे.
एड शीरन सात दिवसांपूर्वी भारतात आला. त्याने भारतात आल्यावर आयोजित पहिल्या लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडीओही शेअर केला होता. भारतात आल्यावर पुण्यातील यश लॉन्स येथे त्याचा पहिला लाइव्ह कॉन्सर्ट शो झाला. त्यानंतर हैदराबाद रामोजी फिस्मसिटी व ५ तारखेला चेन्नईच्या वायएमसीए ग्राउंडमध्ये एड शीरनचा लाइव्ह कॉन्सर्ट शो झाला. आता पुढे आधी बेंगळुरू, शिलाँग व मग दिल्लीमध्ये त्याचे कार्यक्रम होणार आहेत.