Ed Sheeran And Shilpa Rao Viral Video: हॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक एडवर्ड क्रिस्टोफर शीरन (Ed Sheeran)चा सध्या भारत दौरा सुरू आहे. त्यामुळे तो कधी रिक्षामधून फिरताना दिसत आहे, तर कधी डोक्याची मालिश करून घेताना दिसत आहे. अलीकडेच Ed Sheeran बंगळुरू येथील एका चर्चच्या बाहेर गाताना दिसला. पण तितक्यात बंगळुरूच्या पोलिसांनी कारवाई केली. थेट स्पीकरच्या वायर काढल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पण, सध्या Ed Sheeran आणि लोकप्रिय गायिका शिल्पा रावच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
९ फेब्रुवारी, रविवारी Ed Sheeranचा बंगळुरूमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टमध्ये Ed Sheeranला साथ देण्यासाठी शिल्पा राव पोहोचली होती. आपल्या सुमधूर आवाजाने मनं जिंकणाऱ्या Ed Sheeran आणि शिल्पा रावने यावेळी उपस्थित श्रोत्यांना खास सरप्राइज दिलं.
बंगळुरूमध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Ed Sheeranने चक्क शिल्पा रावबरोबर तेलुगू गाणं गायलं; जे ऐकून उपस्थित श्रोते हैराण झाले आणि ते भारावून गेले. यावेळी Ed Sheeran आणि शिल्पा रावने ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील ‘चुट्टमल्ले’ गाणं गायलं. याचा व्हिडीओ Ed Sheeranने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Ed Sheeranने शिल्पा रावबरोबरचा या परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “गेल्या काही दिवसांपासून शिल्पा रावच्या आवाजाचा चाहता झालो आहे. आज तिच्याबरोबर प्रत्यक्षात परफॉर्मन्स करणं आणि एक नवीन भाषा शिकणं हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.”
Ed Sheeran आणि शिल्पा राव यांच्या या परफॉर्मन्सवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “Ed Sheeranने तेलुगू गाणं गायलं पाहिजे, हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हा ब्रिटीश गायक भारतात स्थायिक झाला तरी माझी हरकत नाही.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आता Ed Sheeran भारतीय आहे.
दरम्यान, याआधीच्या चेन्नईच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Ed Sheeranने प्रसिद्ध ए.आर. रेहमान यांच्याबरोबर परफॉर्मन्स केला होता. यावेळी ए.आर.रेहमान Ed Sheeranची लोकप्रिय गाणी गाताना पाहायला मिळाले होते. तेव्हादेखील उपस्थित श्रोते Ed Sheeran आणि ए.आर. रेहमान यांचा एकत्र परफॉर्मन्स पाहून हैराण झाले होते.