सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्यावर तब्बल अडीचशे कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती त्यांच्या मृत्यूनंतर समोर आली. यासंदर्भात एडलवाईस एआरसी कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करून नितीन देसाईंच्या कंपनीवर असलेल्या कर्जाचे तपशील उघड केले आहेत.
एडलवाईस एआरसीने गुरुवारी नितीन देसाई यांची कंपनी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. “नितीन देसाई यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो,” असं कंपनीने म्हटलं आहे. यासंदर्भात ‘इकोनॉमिक टाइम्स’ने वृत्त दिलं आहे.
देसाई यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती, असंही कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. याबाबत एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने २५ जुलै २०२३ रोजी नितीन देसाई यांची कंपनी ND’s Art World Private Limited विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशात खंडपीठाने दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जितेंद्र कोठारी यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशन म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, एनसीएलटीच्या आदेशाविरुद्ध नितीन देसाईंच्या कंपनीने एनसीएलएटीच्या नवी दिल्लीतील खंडपीठामध्ये अपील केले होते. पण ते अपील १ ऑगस्ट २०२३ रोजी फेटाळून लावण्यात आले, असंही पत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचा – जेजे रुग्णालयात झाले नितीन देसाईंचे शवविच्छेदन, मृत्यूचे कारण आले समोर
“नोव्हेंबर २०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीने १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका करण्यात आली होती,” असंही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
“याप्रकरणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू तसेच कायदेशीर प्रक्रियेचे पालन करू” असेही कंपनीने निवेदनात म्हटले आहे.