कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी शुक्रवारी एडलवाईस कंपनीचे चेअरमन रेशेश शहा यांच्यासह एडलवाईस ग्रुपच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये केयूर मेहता, स्मिथ शाह, आरके बन्सल आणि जितेंद्र कोत्री यांची नावे आहेत.
नितीन देसाईंचा स्टुडिओ चांगला चालत असताना एडलवाईस कंपनीने त्यांना मोठे कर्ज देऊ केले. कोविड लॉकडाऊननंतर व्यवसाय ठप्प झाला, त्यावेळी कर्जाच्या परतफेडीसाठी कंपनीने देसाई यांना त्रास द्यायला सुरुवात केली, असे पोलिसांनी त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देऊन सांगितले. दरम्यान, या आरोपांवर एडलवाईस कंपनीचं स्पष्टीकरण आलं आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल
कंपनीच्या पत्रकात म्हटलंय, “एडलवाईस एआरसीला नितीन देसाई यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. काही गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की नितीन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी २०१६ आणि २०१८ मध्ये आर्थिक मदत देण्यात आली होती. २०२० पासून कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केलं, पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर देसाईंच्या कंपनीला २०२२ मध्ये NCLT कडे (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) पाठवण्यात आले आणि जुलै २०२३ मध्ये NCLT ने देसाईंच्या कंपनीविरोधात दिवाळखोरीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.”
नितीन देसाईंवर तब्बल २५२ कोटी रुपयांची थकबाकी, एडलवाईस एआरसी कंपनीने उघड केले कर्जाचे तपशील
पत्रकात पुढे म्हटलंय, “यासाठी एडलवाईस एआरसीने रिझर्व्ह बँकेने अनिवार्य केलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले होते आणि कायदेशीर चौकटीच्या बाहेर कोणतेही कार्य केलेले नाही. नितीन देसाईंच्या कंपनीकडून आम्ही जास्त व्याजदर आकारला नाही तसेच कर्जदारावर वसुलीसाठी कधीही अनावश्यक दबाव टाकला नाही. आम्ही आमचे पैसे परत मिळविण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब केला होता.”
Video: नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना पत्नी व मुलांना कोसळलं रडू, आमिर खानने कुटुंबाला दिला धीर
दरम्यान, नितीन देसाईंच्या निधनाने भारतीय कलाविश्वाची मोठी हानी झाल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. तसेच आपण तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्हाला माहीत आहे की अशा दुःखद घटनांची चौकशी करावी लागते आणि त्याचा आम्ही आदर करतो. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू. आम्हाला विश्वास आहे की आम्ही कायदेशीर प्रक्रियेचं पालन केल्याचा निष्कर्ष तेदेखील काढतील.”