सामाजिक आशयाचा लळा आणि सामान्य माणसांच्या व्यथा वेदनांचा कळवळा असलेला संगीत गीतातील एक प्रकार म्हणजे गझल. गेली ४० वर्ष संगीत क्षेत्रात विविध वाद्य वाजवून आता संगीतकार म्हणून काम पाहत असलेल्या प्रशांत ठाकरे यांच्या ‘मिरॅकल्स ऑफ म्युझिक’ या कंपनीतर्फे ‘एहसास’ हा गझल गीतांचा अल्बम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त श्री. रामनाथ सोनावणे यांच्या हस्ते नुकताच डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे प्रकाशित करण्यात आला.
‘एहसास’ या अल्बममध्ये एकूण आठ गझल गीतांचा समावेश करण्यात आला असून एक नज्म ही यात समाविष्ट करण्यात आली आहे. उर्दू साहित्यातील सर्वोच्च मानाचा ‘साहेब ए दिवान’ हा किताब पटकावलेल्या संदीप गुप्ते यांनी ह्या अल्बममधील गझल आणि एक नज्म लिहिली आहेत. संदीप गुप्ते हे सरकारी नोकरीत कार्यरत असून संगीताची त्यांना असलेली आवड त्यांनी चांगलीच जोपासली आहे. प्रसिद्ध गायिका गौरी कवी यांच्या आवाजात हा संपूर्ण अल्बम स्वरबद्ध करण्यात आला आहे.
गेली ४० वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रशांत ठाकरे यांनी ‘एहसास’ या अल्बमचे संगीत आयोजन, संगीतकार म्हणून काम पाहिले आहे. प्रत्येक कडव्याला वेगळे संगीत देणे हे प्रशांत ठाकरे यांच्या संगीताचे एक खास वैशिष्ट्य आहे.
आठ वर्षापूर्वी ‘अजनबी शहर में…’ या अल्बमच्या निमित्ताने आमच्या तिघांची एका स्टुडिओमध्ये सहज भेट झाली. आपण या पुढे नक्की एकत्र काम करू असे आम्ही ठरविले. त्यानंतर ‘एहसास’ च्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. गेली दोन वर्ष आम्ही या अल्बमसाठी काम करत होतो आणि आता हा अल्बम बाजारात रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच या अल्बममधील नज्म असलेल्या ‘इस तरह मेरी मोहोब्बत का ….’ चा व्हिडीओ ही लवकरच चित्रित करण्यात येणार असल्याचे संगीतकार प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.
‘एहसास’ या गझल अल्बमचा प्रकाशन सोहळा संपन्न!!
सामाजिक आशयाचा लळा आणि सामान्य माणसांच्या व्यथा वेदनांचा कळवळा असलेला संगीत गीतातील एक प्रकार म्हणजे गझल.
First published on: 29-12-2014 at 11:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ehsaas gazal album launch