राज्यभरातील आठ प्रमुख शहरे, त्या शहरांच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालये आणि त्यात शिकणाऱ्या हजारो तरुण विद्यार्थ्यांमधला सळसळता उत्साह, त्यांच्या कल्पना, त्यांचे नवे विचार, जुन्या तत्त्वांशी त्यांची झालेली जुळवणूक आणि त्यांच्या अत्याधुनिक जीवनशैलीतील जगण्याचा नवा वेग या सगळ्यांचे प्रतिबिंब जणू ‘लोकांकिकां’मध्ये एकवटले आहे. ‘लोकसत्ता’ने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या ‘राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फे ऱ्यांमध्ये सादर झालेल्या एकांकिकांनी या स्पर्धेचे ‘लोकांकिका’ हे नाव सार्थ ठरवले आहे. आत्तापर्यंत सर्वच प्रमुख शहरांमधून ‘लोकांकिका’च्या प्राथमिक फे ऱ्या पूर्ण होत आल्या आहेत. नव्या विचारांचे वारे पिऊन रंगमंचावर तितक्याच ताकदीने पहिली एकांकिका सादर करणाऱ्या या तरुण स्पर्धकांचे ‘लोकांकिका’तील नवखेपण प्राथमिक फे ऱ्यांमध्येच संपले आहे. आता तयारी सुरू झाली आहे ती विभागीय अंतिम फे रीतील चुरशीची..
‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’ आणि ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचा दुसरा अंक ठिकठिकाणच्या विभागीय अंतिम फेरीने सुरू होणार आहे. राज्यातील आठही केंद्रांवर या विभागीय अंतिम फेरीतून प्रत्येकी एक एकांकिका निवडली जाणार आहे. ३० नोव्हेंबरपासून ‘लोकांकिका’च्या नाटय़जागराला सुरुवात झाली होती. राज्यातील आठ शहरांमध्ये एकामागोमाग एक प्राथमिक फे ऱ्या सुरू झाल्या. त्याची सुरुवात पुण्यातून झाली. पुणे, नाशिक, नगर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, औरंगाबाद आणि नागपूर अशा प्रत्येक विभागातील प्राथमिक फे ऱ्यांना सुरुवात झाली तेव्हा उत्सुकता होती ती तरुणाईच्या प्रतिसादाची.. त्यांचे ‘लोकांकिका’ साठी उचललेले पहिले पाऊल कसे असेल, हा प्रश्नच आता ठिकठिकाणच्या तरुणाईने ज्या जल्लोषात एकांकिका सादर केल्या त्यामुळे उरलेला नाही. ‘लोकांकिकां’च्या आठ केंद्रांवरील प्राथमिक फे ऱ्यांच्या रंगतदार अंकाची झलक खास ‘रविवार वृत्तांत’च्या वाचकांसाठी..
मुंबई आणि ठाण्यात तरुणाईने ‘लोकांकिका’मधून गावखेडय़ापासून शहरांच्या आधुनिक समस्यांचा वेध घेतला..
मुंबई आणि ठाण्याच्या तरुणांसाठी नाटक हा रोजच्या जगण्यातला श्वास आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये इतकं नाटय़वेड, नाटय़परंपरा इथे रुजलेली आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये एक-एक कट्टा तरी या नाटय़वेडय़ा तरुणाईचा असतो. त्यामुळे ‘लोकांकिका’साठी या नाटय़वेडय़ा तरुणाईची हजेरी महत्त्वाची होती. मुंबईत परीक्षांचे वेळापत्रक सांभाळून मुलांनी अगदी एक आठवडा ते एक रात्र इतक्या कमी कालावधीत ‘लोकांकिका’साठी एकांकिका बसवल्या होत्या आणि तरीही त्यांनी जे विषय निवडून ते ज्या तयारीने रंगवले त्याला तोड नव्हती. इथे मोठय़ा प्रमाणावर प्रथम आणि द्वितीय वर्षांतील मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. एकांकिका सादर करण्याचा कुठलाही अनुभव नसताना ‘लोकांकिका’च्या नव्या आणि मोठय़ा व्यासपीठावर एकांकिका सादर करायची संधी मिळाल्याबद्दल या स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला. किंबहुना ही संधी त्यांनी खेचून घेतली आणि आपला जास्तीत जास्त ठसा उमटवण्यासाठी त्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वास्तवाचे चित्रण एकांकिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. कोळीवाडय़ात राहणाऱ्या मुलांनी त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना ऐकल्या होत्या. त्या अनुभवातूनच टी. के. टोपे महाविद्यालयाची ‘तिची गोष्ट’ ही एकांकिका साकार झाली. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतिमंद मुलांवरच्या उपचारांचा अभ्यास करताना त्यांच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या. हाच विषय त्यांनी ‘रोशनी.. एक आशेचा किरण’ या एकांकिकेतून मांडला. खाडीवर काम करणाऱ्या मुलींचे जीवन जवळून पाहणाऱ्या वडाळ्याच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘ब्लॅक वॉटर’ या एकांकिकेची कथा लिहिली. मुंबईतील प्राथमिक फेरीत साकार झालेल्या एकांकिकांचे विषय हे मध्यमवर्ग आणि सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातील अडचणींना कधी वास्तव तर कधी फँटसीच्या अंगाने रंगवणारे होते. पण, या प्रत्येक एकांकिके मधून ते विषय रंगवताना त्यांनी त्यांची त्या प्रश्नाची त्यांना असलेली जाण आणि समस्येची उकल करण्याची त्यांची पद्धत ही वेगळी होती हे जाणवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे, मुंबईतील मुलं बेफिकीर आयुष्य जगतात या विधानाचा फे रविचार करावा इतक्या सुजाण पद्धतीने त्यांनी हे विषय रंगवलेले पाहायला मिळाले.
पुण्यामध्ये पार पडलेल्या ‘लोकांकिकां’च्या प्राथमिक फेरीत पुण्यासोबतच सोलापूर, इस्लामपूर, बारामती या ठिकाणांहूनही महाविद्यालयीन मुलांनी एकांकिका सादर केल्या होत्या. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना एकाच मंचावर आपले विचार एकांकिकांच्या माध्यमातून मांडण्याची अनोखी संधी मिळाली. इथे सादर झालेल्या एकांकिकांमध्ये सामाजिक प्रश्नांवर भर दिला गेला होताच; पण त्याच वेळी सादरीकरणामध्ये कल्पकतेतून विषय खुलवण्याचा प्रयत्न मुलांकडून करण्यात आला होता. त्यामुळे कमीत कमी जागेचा पुरेपूर वापर करत, विविध विषयांची हाताळणी करण्यात आली होती. एकांकिकांच्या नेपथ्यातली कल्पकता तरी किती असावी.. कमीत कमी गर्दीत स्टेडिअमचा माहौल तयार करणे, मंचावरच रंगलेले अद्भुत जादूचे प्रयोग इथपासून ते अगदी मूकनाटय़ासारखा प्रयोगही स्पर्धकांनी आपल्या एकांकिकांच्या मांडणीतून केलेला पाहायला मिळाला.
नाशिकमध्ये दोन दिवस ‘लोकांकिका’ची प्राथमिक फे री रंगली होती. यात सादर झालेल्या एकांकिकांमधील विषयांमध्ये प्रामुख्याने पैसे, सत्ता, विलासी आयुष्य यांच्या हव्यासापोटी माणसाची ‘माणूस’ म्हणून हरवत चाललेली ओळख यावर भाष्य करणाऱ्या कथांचा समावेश होता. जातीय दंगल, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माध्यमांमध्ये होणारे राजकारण, सणांना आलेले व्यावसायिक स्वरूप, कुटुंबातील नात्यांमध्ये वाढत चाललेला दुरावा यांसारख्या विषयांची हाताळणी करताना लोप पावत चाललेल्या माणुसकीचे चित्रण या एकांकिकांमधून करण्यात आले होते. तीन वेगवेगळ्या वयांतील स्त्रियांनी साकारलेली ‘पाठवण’सारखी एकांकिका हा एक सुखद धक्का होता. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ हे विधान आजवर आपण कायम ऐकलेलं आहे; पण वंश चालवणं म्हणजे नेमकं काय हो.. आधीच्या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं म्हणजेच खरा वंश चालवणं होय.. असं आपल्या सासूबाईंना पटवून देणारी आणि आपल्या मुलीने हे सत्य कृतीतून उतरवलं आहे याची जाण करून देणारी सून ‘पाठवण’मधून पाहायला मिळाली, तर दुसरीकडे याच नाशिक शहरात कॉर्पोरेट जीवनशैली अंगीकारलेल्या एका त्रिकोणी कुटुंबाच्या निमित्ताने जीवनातलं अंतिम सत्य काय असतं याचं अगदी व्यावहारिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘इटर्नल ट्रथ’सारख्या एकांकिकेतून केलेला दिसला. एकाच शहरात दंगल, शेतकरी, वंशाचा दिवा ते जीवनातलं अंतिम सत्य इतके टोकाचे विषय अत्यंत संवेदनशीलतेने मांडलेले पाहायला मिळणं ही अनोखी पर्वणी होती.
तर नगरमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतही ग्रामीण आणि शहरी भागांतील विविध संघांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. त्यामुळे या दोन्ही भागांतील सांस्कृतिक जीवनाचा कलाविष्कार ‘लोकांकिका’च्या मंचावर पाहायला मिळाला. विशेष म्हणजे स्पर्धेतील नियोजन आणि सुसूत्रता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष भावली. महाराष्ट्राच्या इतर शहरी भागांच्या तुलनेत त्यांना अशा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी फारशी मिळत नसल्यामुळे या संधीचे सोने करण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला.
आता चुरशीचा अंक दुसरा..
राज्यभरातील आठ प्रमुख शहरे, त्या शहरांच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालये आणि त्यात शिकणाऱ्या हजारो तरुण विद्यार्थ्यांमधला सळसळता उत्साह..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-12-2014 at 06:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight importent cities colleges and universities and loksatta lokankika