नाटककार सतीश आळेकर यांचं नाव घेतलं की आठवतात ती त्यांची ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ ही गाजलेली नाटकं! त्यांच्या आगेमागे त्यांनी बरीच नाटकं लिहिली असली, ती रंगभूमीवर आली असली आणि कमी-अधिक प्रमाणात चर्चिलीही गेली असली तरी लेखक म्हणून त्यांची ‘सही’ असलेली हीच दोन महत्त्वाची नाटकं. त्यातली त्यांची ब्लॅक कॉमेडी शैली सर्वपरिचित आहे. ‘एक दिवस मठाकडे’ हे त्यांचं नवं नाटक. आयुष्याच्या मावळतीकडे वाटचाल करत असताना पत्नीची अकस्मात साथ सुटल्यानं एकाकीपण वाटय़ाला आलेल्या एका वयस्क माणसाची कैफियत आणि त्यानं आपल्या सहजीवनाचा मांडलेला लेखाजोखा यात आहे. एकीकडे हे मांडताना तरुण पिढीच्या मनातली भविष्याबद्दलची चिंता, अस्वस्थता आणि त्यातून येणारी बेचैनीही लेखकानं त्या पाश्र्वभूमीवर रेखाटली आहे.
एक तरुण मठाकडे जाण्याचा रस्ता शोधत असताना वाटेत त्याला वयस्क गृहस्थ दिसतात. तो त्यांना मठाकडे जाण्याचा रस्ता विचारतो. रस्ता दाखवण्याऐवजी ते भलतंच काहीतरी बोलत राहतात. सांगत राहतात. त्यालाही त्यात गंमत वाटते. तो त्यांच्याशी संवाद करत राहतो. खरं तर त्यांचं बोलणं वरकरणी निर्थक, संदर्भहीन वाटतं; परंतु खोलात विचार करता त्यातही काही संदर्भितता असल्याचं जाणवतं. प्रत्यक्षात तशी ती आहेच. पण ती जाणून घेण्यासाठी खूप आतून नाटक समजून घ्यावं लागतं. त्यांच्या बोलण्यात अनेक गोष्टी येतात. त्यातून काय काय कळत जातं. तरुणाच्या घरच्यांची विचारपूस करताना हिंदी सिनेमांचे स्ांदर्भ येतात. त्यातले नायक, त्यांची गाणी.. त्यांच्या उल्लेखातून मागच्या पिढीचं सहजीवनही असंगत, संवादरहित असल्याचं आडवळणानं आपल्या ध्यानी येतं. काळाचा काच तसंच परंपरा, रूढी आणि मूल्यांचं जोखड वागवत; तरीही आपापल्या स्व-धर्माशी जमेल तितपत इमान राखत त्यावेळची माणसं जगत असल्याचं त्यातून सूचित होतं. तरुणाच्या आजोबांना देवानंद आणि त्याचे सिनेमे प्रचंड आवडत. पण आजीला देवानंद बिलकूल आवडत नसे. परंतु नवऱ्यासाठी तिनं देवानंदला खपवून घेतलं होतं. एवढंच नव्हे, तर नवऱ्याच्या वर्षश्राद्धाला २१ ब्राह्मणांना भोजन घालताना त्यांना देवानंदचा ‘ज्वेलथीफ’ दाखवण्याचं पत्नीकर्तव्यही पार पाडलं होतं. तिला स्वत:ला मनातून आवडे तो दिलीपकुमार. पण त्याचा धर्म मुसलमान. त्यामुळं उघडपणे तिला त्याला कधी नावाजता आलं नाही. मात्र, मशिदीतील बांग ऐकताना ती कातर होई.. अशी तिची आठवण तरुणाच्या आईनं नमूद केली होती.
तरुणाची आई अलीकडेच गेलीय. तिच्या पश्चात त्याला मार्गदर्शन करणारं, दिशा दाखवणारं कुणी उरलं नाही. म्हणजे वडील होते; परंतु त्यांचं मार्गदर्शन ‘गुगल’वरच्या माहितीसारखं. भूतकाळातल्या आवश्यक-अनावश्यक माहितीचं बम्बार्डिग; पण खात्रीशीरता नाही. त्यामुळे तो दिसेल त्या व्यक्तीत आपले वडील शोधतोय. या वयस्क गृहस्थातही त्याला आपले वडील दिसतात.
वयस्क त्याचं म्हणणं ऐकून घेतो. पण स्वत:बद्दल काहीच सांगत नाही. अगदीच खोदकाम केल्यावर नाइलाजानं तुटकपणे बोलतो. या एकतर्फी संवादात अखेर त्या गृहस्थाची स्वगताची वेळ येते. आणि तो आपल्या गतायुष्याबद्दल.. आजच्या मळभदाटल्या जगण्याबद्दल स्वत:शीच बोलू लागतो. त्यातून पत्नीच्या अकस्मात जाण्यानं त्याला आलेलं एकाकीपण, सहजीवनातला असंवाद, त्याबद्दलचा पश्चात्ताप, गृहिणीची दैनंदिन कामांतली व्यग्रता, त्यांचं नियोजन, बाळगायची असंख्य व्यवधानं आणि याची आपल्याला कधीच न झालेली जाणीव.. आज तिच्या पश्चात हे सारं स्वत: करताना होणारी तारांबळ, उडणारा गोंधळ आणि त्यातल्या कळलेल्या सूक्ष्म खाचाखोचा यांचा आढावा घेताना एकलेपणाची.. एकाकीपणाची सावली अधिकच गडद होत जाते. दु:ख वाटून घ्यायला सोबत कुणीच नाहीए, ही जाणीव तर आणखीनच विकल करणारी.
हे स्वगत तो त्या तरुणाच्या प्रेयसीपाशी तिलाच आपली सहचरी कल्पून करतो. तीही त्याचं बोलणं त्याच्या पत्नीच्या भूमिकेत शिरून सहानुभूतीनं ऐकते. तिला जाणीव होते, की हा असंवाद आपण आपल्या बाबतीत तरी टाळायला हवा. म्हणूनच ती म्हणते : ‘जिवंत असताना वेळ ‘स्वगत’ ऐकण्यातच गेला. ‘संवाद’ होतोच असं नाही. एकूण आता जाणवलं हे बरं झालं. पण आता तुमचं कथानकच संपलंय.. तो (तरुण) पुढे गेलाय. मला जायला हवं. आमचं कथानक आत्ता कुठं सुरू होतंय..’
नाटककार सतीश आळेकरांचं हे काहीसं आत्मपर वाटावं असं नाटक. सहजीवनातील असंवाद आणि स्वत:च्या जगण्यात व त्यातल्या अनेकविध व्यग्रतांमध्ये गुंतून पडल्यानं आपल्या सोबतीणीला समजून घ्यायचं राहूनच जातं. तिच्या पश्चात तिनं आजवर निभावलेल्या दैनंदिन जबाबदाऱ्या पेलताना मात्र हे सगळं प्रकर्षांनं जाणवतं. सहचरीचं महत्त्व, तिच्यासोबतच्या आयुष्यातलं न आकळलेलं बरंच काही आता आकळू लागतं. दिनक्रमातल्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीही किती महत्त्वाच्या असतात, हे कळून येतं. त्यात खर्च होणारी शक्ती- बौद्धिक, मानसिक व शारीरिकही- जाणवते. एका अर्थी हा साक्षात्कार असतो. आपण जगलेल्या, न जगलेल्या क्षणांचा! पण आता वेळ निघून गेलेली असते. आयुष्य हातून निसटून गेलेलं असतं. मठाकडे जाऊन आता काहीच उपयोग नसतो.. त्या तरुणालाही हेच तर जाणून घ्यायचं नसेल?
आळेकरांच्या नाटकांतल्या पात्रांच्या चमत्कारिक वागण्यातला घनचक्करपणा या नाटकातही आढळतो. विशेषत: संवादशैलीत! आळेकरांनी यात जाणीवपूर्वक काही प्रतिमा-प्रतीकं योजली आहेत. बेलाचं पान उचलल्यावर ऐकू येणारी एकतारी वा भजन हे माणसाच्या आत्मजाणिवेशी संबद्ध आहे. मिठाईवाला, हिंदी चित्रपट वा त्यातली गाणी हे संदर्भही असंच काही सुचवणारे. ‘प्रत्येकाचं खासगी संगीत म्हणजे वेदनाशामक झंडू बाम असतो!’ किंवा ‘खाणं, बोलणं आणि गाणं गोड हवं, आणि बॅलन्स्डही..’ आदी नाटकातली विधानंही गमतीखातर केलेली नाहीत; तर ती जीवनविषयक चिंतनातून आली आहेत. वयस्क आणि तरुण यांच्यातला संवाद वरकरणी असंबद्ध, निर्थक वाटला तरी त्यातही भाष्य आहे. आज संपर्क माध्यमं आणि तंत्रज्ञान अतिप्रगत झालेलं असलं तरीही माणसा-माणसांमधला संवाद मात्र संपुष्टात आला आहे. त्यातून एक तुटलेपण, भविष्याबद्दलची अस्थिरता साऱ्या भवतालाला व्यापून राहिली आहे. मनुष्याला आपल्या अस्तित्वाबद्दलच्या भयगंडानं ग्रासलं आहे. म्हणूनच मठ, बाबा-महाराज-बापूंचं प्रस्थ वाढत चाललं आहे. मन:शांती हरवलेल्या समाजाची विचारशक्तीही हरपते. अन्यथा आधुनिक सुखसुविधांचा उपभोग घेणारी माणसं अशा विवेकहीन गोष्टींच्या मागे लागतीच ना! त्याचबरोबर एक चिरंतन वास्तवही लेखकाला यात सांगायचंय.. आयुष्यभर एकत्र राहूनही माणसं माणसांना कळत नाहीत, समजून घेता येत नाहीत! म्हणूनच यातल्या पात्रांना नावं नाहीत. सार्वत्रिकता हाच त्याचा मूलाधार आहे.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी या नाटकाचा आत्मा आत्मगत करून तो प्रयोगरूपात मंचित केला आहे. मोकळा रंगमंच. मध्यभागी पडद्यावर टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या. याच पडद्याचा पुढं ध्वनिचित्रफितीद्वारे भूतकाळात डोकावण्यासाठी केलेला वापर.. यातून स्थळ-काळाची झेप दाखवणं सोपं गेलं आहे. संहितेतील आशयाला पुष्टी देणारा हिंदी चित्रपटांच्या हीरोंचा परस्परांत विलीन होणारा कोलाज किंवा तरुणाच्या आईची वयोमानपरत्वे बदललेली रूपं दाखवणं त्यामुळे शक्य झालंय. हे नाटक जरी माणसामाणसांतील असंवादाचं असलं तरी त्यात उच्चारित शब्दाला, उच्चारणातील आरोह-अवरोहांना आणि शब्दांवरील वजनाला अनन्य महत्त्व आहे. त्याचबरोबर विरामाच्या नि:शब्द जागांनाही तेवढंच महत्त्व आहे. दिग्दर्शकाने याचं पुरेपूर भान बाळगलेलं आहे. यातल्या निर्थक, असंबद्ध बोलण्यातील ‘नाटय़’ अधोरेखित करण्यात गंधार संगोराम यांनी योजलेल्या संगीताचा मोठा वाटा आहे. अमेय पेंढारकरांच्या प्रकाशयोजनेनं संवाद-असंवादातील शब्दातीत जागा भरून काढल्या आहेत.
वयस्क माणसाचा मावळतीकडचा एकाकी, उदास प्रवास गिरीश कुलकर्णी यांनी सर्वागानं दाखवला आहे. सुरुवातीचं त्यांचं संवादास अनुत्सुक असणं, तिऱ्हाईत वागणं, नंतर तरुणाच्या प्रश्नांना नाइलाजानं उत्तरं देता देता हळूहळू त्यांना संवादात रस वाटू लागणं.. आणि अखेरीस प्रदीर्घ स्वगतातून आपलं हृद्गत व्यक्त करणं.. ‘सूर्य पाहिलेला माणूस’मधल्या डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रदीर्घ स्वगतासारखंच हे मोठय़ा दमसासाची आणि समजुतीची मागणी करणारं स्वगत. गिरीश कुलकर्णी यांनी त्यातल्या विविध भावप्रक्षोभांसह ते जिवंत केलं आहे. वयस्काचं एकाकीपण, सहचरीविनाच्या आयुष्याचा स्वीकार करताना होणारी तगमग, घरातली कामं उरकताना किती किती व्यवधानं बाळगावी लागतात याबद्दलचे सूक्ष्म तपशील कथन करताना त्याला लगडून आलेली कारुण्याची किनार.. हे सगळं त्यांनी अत्यंत पारदर्शीपणे अभिव्यक्त केलं आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंय हे जाणून घेण्याची तरुणाची उत्सुकता, आजची अस्थिर अनिश्चितता आणि त्यातून आलेली विलक्षण बेचैनी अमेय वाघ यांनी संवादोच्चार आणि अस्थिर हालचालींतून ठाशीवपणे पोचवली आहे. वरकरणी असंबद्ध वाटणाऱ्या पृच्छा करतानाचा त्यांचा निरागस चेहरा विलक्षण बोलका आहे. वयस्कासोबतच्या संवादातून काहीच निघत नसतानाही आपलं कुतूहल कायम ठेवण्याची त्यांची धडपड दाद देण्याजोगीच. पर्ण पेठे यांचं मूक अस्तित्व पुरेसं बोलकं आहे.
आळेकरांच्या नाटय़लेखनाच्या उत्तरपर्वातलं हे नाटक माणसाचं जगणं समजून घेण्याचंच एक पुढचं पाऊल आहे.
‘एक दिवस मठाकडे’मावळतीचे एकाकी रंग
नाटककार सतीश आळेकर यांचं नाव घेतलं की आठवतात ती त्यांची ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ ही गाजलेली नाटकं! त्यांच्या आगेमागे त्यांनी बरीच नाटकं लिहिली असली, ती रंगभूमीवर आली असली आणि कमी-अधिक प्रमाणात चर्चिलीही गेली असली तरी लेखक म्हणून त्यांची ‘सही’ असलेली हीच दोन महत्त्वाची नाटकं.
आणखी वाचा
First published on: 28-04-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek divas mathakade lonely colours of evening