तिकीटबारीवर हमखास यशाची बेगमी असलेले चित्रपट देण्यात प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक व निर्माता करण जोहर प्रथमच कॅमेराच्या पाठीमागून कॅमेरा समोर येणार आहे. अनुराग कश्यपच्या बहुचर्चित ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये करणने नकारात्मक छटा असलेली अर्थात खलनायकाची भूमिका वठवली असून त्यासाठी त्याने चक्क मानधन घेण्याचे नाकारले आहे. करण या चित्रपटात एका मोठय़ा वृत्तपत्राच्या संपादकाच्या भूमिकेत दिसणार आहे.  ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा करण जोहरच्या प्रिय मित्राचा आदित्य चोप्राचा चित्रपट होता. त्यात करणने शाहरूखच्या मित्राची भूमिका केली होती. मात्र, त्यानंतर त्याने कॅमेऱ्याच्या मागे राहणेच पसंत केले. दिग्दर्शक म्हणून त्याने हिट चित्रपट दिले. मात्र, त्यानंतर तो चित्रपटनिर्मितीत उतरला. परंतु दिग्दर्शक आणि निर्मात्याची भूमिका करून कंटाळलेल्या करणला काहीतरी बदल हवा होता. अनुरागने त्याला ‘बॉम्बे वेल्वेट’साठी विचारणा केली. करणनेही कोणतेही आढेवेढे न घेता लगेचच होकार भरला. चित्रपटातील भूमिकेसाठी अनुरागच्या फॅण्टम प्रॉडक्शन्सने करणला त्याचे मानधन देऊ केले. परंतु करणने आपण या चित्रपटासाठी एकही पैसा घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
 ‘बॉम्बे वेल्वेट’च्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या विकास बहल यांनीच ही माहिती दिली. हा चित्रपट करणला खूप आवडला असून  त्याच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. केवळ याच कारणास्तव आपण पैसे घेत नसल्याचे करण जोहरने स्पष्ट केल्याची माहिती बहल यांनी दिली. तरीही निर्मात्यांनी औपचारिकता म्हणून का होईना करणला ११ रुपयांचा घसघशीत चेक पाठवला आहे. पैसे न घेण्यामागे करण जोहरचे काहीही कारण असेल. पण, अनुरागच्या या चित्रपटाच्या निमित्ताने करणला अभिनयाची एक नवी वाट सापडली आहे हे निश्चित. ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये करणने अप्रतिम काम केले असून लोकांनी त्याला कधीही इतक्या दमदार अवतारात पाहिलेले नाही, असा निर्मात्यांचा दावा आहे. या चित्रपटानंतर करण पुन्हा विकास बहल यांच्याच आगामी चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत काम करणार आहे. शाहीद कपूर आणि अलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात करण जोहर गोविंदाबरोबर एकत्र काम करणार असल्याचे समजते.

Story img Loader