गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहात झळकलेला ‘एक व्हिलन’ बॉक्स ऑफिसवरचा हिरो ठरला आहे. या चित्रपटाचे तीन दिवसांचे कलेक्शन ५० कोटी रुपये इतके आहे. यावरून प्रेक्षकांनी ‘एक व्हिलन’ चित्रपटाला आपली पसंती दर्शविल्याचे दिसते. मोहित सुरीचा ‘एक व्हिलन’ अशीच वाटचाल करत राहिला, तर अक्षय कुमारचा ‘हॉलिडे’ आणि साजिद खानच्या ‘हमशकल्स’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडण्यात त्याला यश येईल. सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६ कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये गर्दी करीत आहेत. मोहित सुरीच्या ‘मर्डर २’ (२०११) आणि ‘आशिकी २’ (२०१३) या चित्रपटांनंतर ‘एक व्हिलन’ या त्याच्या चित्रपटानेदेखील चांगले यश मिळवल्याने, एक प्रकारे त्याने हॅट्रिक नोंदवली असल्याचे म्हणावे लागेल. पहिल्यांदाच मोहित सुरीने ‘विशेष फिल्मस्’ व्यतिरिक्त बाहेरच्या बॅनरसाठी चित्रपट केला असल्याने, या चित्रपटाने मिळवलेले यश त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ‘एक व्हिलन’ चित्रपटाचे यश ही रितेश देशमुखसाठीसुद्धा आनंदाची बाब आहे. दोन आठवड्यांत हा त्याचा दुसरा हीट चित्रपट आहे. चित्रपट समीक्षकांकडून टीका आणि प्रेक्षकांकडून नाराजीचा सूर येत असतानादेखील ‘हमशकल्स’ या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

Story img Loader