राजन खान यांच्या कथा या माणसांच्या, त्यांच्या अंतरंगातील नानाविध खळबळींच्या, त्यांच्या जगण्याच्या, तसंच नाकासमोर, सरळमार्गी जगत असतानाही जात-धर्माचे, व्यवस्थेचे काच त्यांची कशी कोंडी अन् घुसमट करतात, याचा खोलात जाऊन वेध घेणाऱ्या असतात. लेखक म्हणून, माणूस म्हणून त्यांची एक वैचारिक बैठक आहे. त्या परिप्रेक्ष्यातून भोवतीच्या घटना-प्रसंगांकडे, अनुभवांकडे ते पाहत असतात.. त्यांचा आपल्या परीनं अन्वय लावत असतात.. त्यातून काही जीवनविषयक सत्य हाती लागतं का, हे पाहत असतात.. आणि बेधडकपणे ते वाचकांसमोर ठेवत असतात. मग ते वास्तव कुणाला आवडो अथवा न आवडो. स्त्री व पुरुष यांच्यातील नातं हा तर समस्त लेखक मंडळींचा अनादि काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! राजन खानसुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यांनीही स्त्री-पुरुष नात्याचा वेगवेगळ्या अंगानं, वेगवेगळ्या संदर्भात आपल्या कथा-कादंबऱ्यांतून वेध घेतलेला आहे. स्त्री-पुरुष नात्याचा तळ धुंडाळणाऱ्या त्यांच्या अशाच एका कथेवर आधारीत ‘एका रात्रीची बाई’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलेलं आहे. नाटकाच्या नावावरून त्याचा विषय ‘हिट् अॅण्ड हॉट’ असावा असा समज होण्याची शक्यता असली तरी तसं काहीच या नाटकात नाही. उलट, अत्यंत प्रगल्भपणे स्त्री-पुरुष नात्याकडे पाहण्याचा प्रयत्न हे नाटक करतं. किरण पोत्रेकर यांनी राजन खान यांच्या मूळ कथेची रंगावृत्ती तयार केली असून, त्यांनीच नाटकाचं दिग्दर्शनही केलेलं आहे.
स्त्री-पुरुष नात्याकडे लिंगनिरपेक्ष भावनेनं पाहता येईल का, हा या नाटकाचा गाभ्याचा विषय! स्त्री-पुरुष असमानतेमागे पुरुषप्रधान मानसिकतेचा मोठा वाटा आहे. ती जोवर स्त्री-पुरुषांच्या मनातून हद्दपार होत नाही, तोवर त्यांच्यात खऱ्या अर्थी समान पातळीवरचं नातं निर्माणच होऊ शकणार नाही. आज स्त्रियांनी पुरुषांची मानली जाणारी बहुतेक क्षेत्रं काबीज केली आहेत. नव्हे, त्यात आपल्या कर्तृत्वाचे झेंडेही गाडले आहेत. परंतु तरीही स्त्रीला समाजात पुरुषाच्या बरोबरीचं स्थान मिळालंय असं म्हणता येणार नाही. वरकरणी जरी तसं ते दिसत असलं तरी समाजाच्या मानसिकतेत त्यादृष्टीनं आवश्यक तो बदल अद्यापि झालेला नाही. किंबहुना, पुरुषांच्या मनात पुरुष व स्त्री यांच्या संबंधात परंपरेनं घट्ट रुजलेले जे ग्रह-पूर्वग्रह आहेत, त्यांतून त्यांची जी मानसिकता घडली आहे, ती जोवर पूर्णपणे बदलत नाही, तोवर लिंगभेदातीत समाज निर्माण होणं अवघड आहे. तसे प्रयत्न स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीतून होत आहेत. अनेक पुरुषही ही समानता आणण्यासाठी आपल्या परीनं झटताहेत. परंतु यासंदर्भातली सामाजिक बदलाची गती अत्यंत मंद आहे. याचं कारण पुरुषांवर लहानपणापासूनच लिंगभेदातीततेचे जे संस्कार घरीदारी होणं गरजेचे आहे, तेच मुळात होत नाहीत. याला अर्थात स्त्रियाही कारणीभूत आहेत. आपल्या मुलांवर स्त्री-पुरुष समतेचे संस्कार त्यांनीही करायला हवेत. पण तसे ते केले जात नाहीत. आणि मग तरुणपणी अकस्मात पुरुषप्रधान मानसिकतेत घडलेल्या मुलांना स्त्री-पुरुष समानतेला सामोरं जावं लागतं तेव्हा त्यासाठी त्यांची मानसिक तयारीच झालेली नसल्यानं बुद्धीच्या पातळीवर जरी त्यांना स्त्री-पुरुष समानता पटत असली, तरी प्रत्यक्ष ती आचरणात आणणं त्यांना जड जातं. स्त्रीचं स्त्रीत्व विसरून तिच्याशी व्यवहार करणंही त्यांना जमत नाही. ‘एका रात्रीची बाई’मध्ये हाच कळीचा मुद्दा मांडलेला आहे.
गैबान्या आणि लेखक हे दोघं मित्र एकत्र राहतात. ते एकमेकांचे जीवश्चकंठश्च मित्र असले तरी गैबान्याच्या विक्षिप्त वागण्या-बोलण्यामुळे तो आपल्याला पूर्णपणे कळलाय असं लेखक म्हणू शकत नाही. कारण गैबान्या कधी काय करेल याचा नेम नसतो. एके दिवशी गैबान्या चक्क एका तरुण मुलीला घेऊन घरी येतो. प्रचंड हादरलेली, आपल्याच कोशात गेलेली ती मुलगी गैबान्याला बसस्टॅण्डवर भेटलेली असते. तिची सैरभैर अवस्था पाहून त्यानं तिला कशीबशी मनवून आपल्या घरी आणलेलं असतं. जिचं पूर्वायुष्य काय हे माहीत नाही, जिची ओळखदेखही नाही अशा या मुलीला गैबान्या थेट आपणा ब्रह्मचाऱ्यांच्या मठीत घेऊन आल्यानं लेखक वैतागतो. पण गैबान्यापुढं काही बोलायची सोय नसते. यथावकाश गैबान्या त्या मुलीला बोलतं करतो आणि तिची भीषण, करुण कहाणी त्यांना समजते. प्रियकराबरोबर गावाहून पळून आलेली ती मुलगी लग्न ठरलेल्या आपल्या बहिणीचे दागदागिने आणि रोकड घेऊन त्याच्यासोबत या शहरात आलेली असते. पंधरा दिवस हॉटेलात राहून मौजमजा केल्यावर एके दिवशी तो मुलगा तिचे पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला. या अनोळखी शहरात नवखी, सर्वस्वानं लुबाडली गेलेली ती मुलगी निष्कांचन अवस्थेत कुठं जायचं, या चिंतेनं भयकंपित होते. हॉटेलच्या मॅनेजरला सर्व वस्तुस्थिती सांगते. तेव्हा तो- ‘काय वाट्टेल ते करून तू हॉटेलचं बिल अदा कर,’ म्हणून तिला फर्मावतो. ते करू न शकल्यानं तिला एका खोलीत कोंडून तो तिच्यावर अत्याचार करतो आणि तिला हाकलून देतो. सर्वार्थानं लुटली गेलेली ती बसस्टॅण्डवर येते. पण जवळ कपर्दिकही नसताना कुठं जायचं, कसं जायचं, या विचारांत तीन-चार दिवस ती तिथंच घुटमळत राहते. तिथले मवाली तिचा गैरफायदा घेऊ बघतात. तशा अवस्थेत ती गैबान्याच्या दृष्टीस पडलेली असते. तिची ती अवस्था पाहून ती संकटात असल्याचं त्याला जाणवतं. तो तिला आपल्यासोबत घरी चलण्यास सुचवतो. परंतु नरकवत अनुभवांतून गेलेली ती मुलगी त्याला आधी साफ नकार देते. पण मग तिथल्या एका पोलिसांच्या सांगण्यानं खात्री पटल्यानं म्हणा, किंवा गैबान्याच्या बोलण्यातून त्याचं सच्चेपण जाणवल्यानं म्हणा; ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी येते.
गैबान्या तिची कहाणी ऐकून ‘कुठंय तो हॉटेलवाला? त्याला चांगलाच धडा शिकवतो!,’ म्हणत तिला ते हॉटेल दाखवायला सांगतो. पण प्रचंड दडपणाखाली असलेली ती यास नकार देते. बरं, आता गावाकडे तरी पुन्हा कुठल्या तोंडानं जाणार? गैबान्या तिला त्या रात्री आपल्या घरी राहायला सांगतो. आणि सकाळी उठून कुठं जायचं किंवा न जायचं, याचा तुझा तू निर्णय घे म्हणून सांगतो. आम्ही जरी दोघे पुरुष या घरात राहत असलो तरी तू घाबरू नकोस, तुला इथं कसलाही धोका नाही. आमच्यासोबत तूही स्वत: एक पुरुष आहेस असं समजून बिनधास्त राहा, असं तो तिला सांगतो. लेखकाला असं वागणं अशक्यकोटीतलं वाटतं. एका अनोळखी स्त्रीबरोबर दोन पुरुषांनी रात्री एका छताखाली राहणं त्याला बेचैन करतं. तो तसं गैबान्याला बोलून दाखवतो. तेव्हा गैबान्या त्याला तिच्याकडे ‘स्त्री’ म्हणून नाही, तर ‘माणूस’ म्हणून पाहा, असं त्याला सुनावतो.
..त्या रात्रीची लेखकाची मानसिक घालमेल आणि त्यातून सर्वानाच झालेला ‘माणूस’पणाचा साक्षात्कार म्हणजे ‘एका रात्रीची बाई’ हे नाटक होय!
किरण पोत्रेकर यांनी कथेचं नाटय़ीकरण करताना लेखकाचं कथन आणि प्रसंग सादरीकरण यांच्या सरमिसळीतून नाटक आकारलं आहे. तसं पाहता या कथेचा जीव अगदीच छोटा आहे. त्यामुळे हा दीर्घाक काहीसा लांबल्यासारखाच वाटतो. रूपांतरकार व दिग्दर्शक म्हणून पोत्रेकर यांनी या कथेला न्याय देण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केला असला तरी काही उणिवा, दोष त्यांच्याकडून राहून गेले आहेत. यातल्या पात्रांच्या व्यवहारांत बऱ्याचदा कृत्रिमता जाणवते. गैबान्या हे पात्र लेखकानं आपल्याला जे म्हणायचं आहे ते सांगण्याकरता निर्माण केलेलं मनस्वी, अविश्वसनीय पात्र आहे. त्याचं वागणं-बोलणं वरकरणी विक्षिप्त वाटलं तरी त्याच्यात माणुसकी मात्र शिगोशिग आहे. या पात्राला विश्वासार्हता प्राप्त होण्याकरता तशाच ताकदीच्या कलाकाराची निवड आवश्यक होती. शोण भोसले यांनी गैबान्याचं मनस्वीपण पेलण्याचा आपल्या परीनं खूप प्रयत्न केला आहे; परंतु त्यात कृतकतेचाच भास होतो. त्यांची बोलण्याची नाटकी तऱ्हा याला कारण आहे. त्यात सहजता नाही. नाना पाटेकरांचं अनुकरण त्यात जाणवतं. गैबान्याचं मनस्वीपण आतून आलेलं वाटत नाही. तीच गोष्ट लेखकाची! हे लेखकराव इतके भोट कसे, कळत नाही. साधा तर्कही त्यांना लढवता येऊ नये? लेखक ही सर्जनशील जमात असते. भवताल जाणून घेत त्याचा अन्वय लावण्याची ताकद त्यांच्यात असते. असं असताना सुनील तांबट यांनी साकारलेल्या यातल्या लेखकात ती प्रगल्भता बिलकूल दिसून येत नाही. या लेखकाला पडणारे प्रश्न इतके उथळ व स्वार्थी कसे? त्याच्या वागण्यातही उथळपणा जाणवतो. क्वचित या मर्यादांवर मातही केली जाते; पण फारच थोडय़ा वेळा. हे पात्र अधिक सखोल असतं तर नाटक अधिक परिणामकारक झालं असतं. त्याचे मंचीय व्यवहार व हालचालीही फार्सिकल व कृत्रिम वाटतात. त्याला आपल्यातल्या ‘माणूस’पणाच्या झालेल्या साक्षात्काराचा क्षण मात्र हृद्य आहे. गेल्या काही दिवसांत अनेक भीषण प्रसंगांतून गेलेली मुलगी जे वर्तन करील, तसं वर्तन नाटकातल्या या मुलीच्या वागण्या-बोलण्यात त्या तीव्रतेनं (्रल्ल३ील्ल२्र३८) येत नाही. ती सहजपणे त्या दोघांचं ‘माणूस’पण स्वीकारते. या स्वीकाराआधी तिच्या मनात उठलेली भावनिक-मानसिक आंदोलनं नाटकात येत नाहीत. तिनं त्यांचं निखळ माणूसपण स्वीकारणं काहीसं घाईघाईचं व अस्वीकारार्ह वाटतं. कोमल खामकर यांनी या भूमिकेत प्राण फुंकण्याची पराकाष्ठा केली आहे. परंतु या व्यक्तिरेखेच्या खोलात संहिताच न गेल्यानं त्यांचाही नाइलाज झालेला आहे.
अशा काही खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरीही नाटककर्त्यांच्या प्रामाणिक हेतूबद्दल यत्किंचितही शंका नाही. अत्यंत गंभीरपणे त्यांनी कथेतला आशय पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुष नात्यात हे निव्वळ ‘माणूस’पण ज्या दिवशी येईल, तो सुदिन!
सचिन गोताड यांचं नेपथ्य ठीक. डॉ. महेंद्र कठाडे यांचं गीत, संगीत आणि गायन मधुर आहे. अरुण कानविंदे यांचं पाश्र्वसंगीतही आशयाला उठाव देणारं आहे.
नाट्यरंग : ‘एका रात्रीची बाई’ ‘माणूस’पणाचा शोध
राजन खान यांच्या कथा या माणसांच्या, त्यांच्या अंतरंगातील नानाविध खळबळींच्या, त्यांच्या जगण्याच्या, तसंच नाकासमोर, सरळमार्गी जगत असतानाही जात-धर्माचे, व्यवस्थेचे काच त्यांची कशी कोंडी अन् घुसमट करतात, याचा खोलात जाऊन वेध घेणाऱ्या असतात.
आणखी वाचा
First published on: 05-05-2013 at 12:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eka ratrichi bai trace for humanity