रवींद्र पाथरे

तीन दगडांची चूल मांडली होती मी

तीन दगडांची चूल मांडली होती मी

सिलेंडर, रॉकेल किंवा ज्ञानेश्वराची पाठ

असले चोचले माझ्याच्यानं शक्य नव्हते

 

माझ्या भुकेला मी

सेन्सेक्स,

जीडीपी रेशो

अनएम्प्लॉयमेंट रेट

अशा सगळ्या थापा मारून झाल्या

तरीही ऐकेनाच म्हटल्यावर

तीन दगडांची चूल मांडली होती मी

पण एक दगड कुणीतरी चोरून नेला

 

आता दोन दगडांच्या चुलीवर

लवंडतंय माझं भांडं

त्या डुचमळातून खाली

चुलीवर पाणी पडत राहतं

दोन दगडांच्या चुलीवर कसं निभवायचं

आणि येणारे-जाणारे हसतात.. म्हणतायत –

दोन दगडांची कधी चूल असती का?

दोन दगडांची कधी चूल असती का?

 

बुद्रुकवाडीच्या जत्रेतला पोपट (कवी) हे भीषण वास्तव मांडत असतो आणि लोक त्याला ‘निगेटिव्हिटी’ पसरवतो म्हणून मुर्खात काढत असतात. ‘टाइमपास’ म्हणून त्याला जत्रेतल्या मंचावर ‘वापरलं’ जात असतानाही तो जीव तोडून आपलं म्हणणं मांडत असतो. आणि हेच प्राजक्त देशमुख लिखित आणि रणजीत पाटील दिग्दर्शित ‘एकादशावतार’ या दीर्घाकाचं सार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

‘सं. देवबाभळी’ या नाटकानं सांप्रत काळी रंगभूमीवर प्राजक्त देशमुख या नव्या नाटय़लेखकानं जन्म घेतला आहे. या एकाच नाटकानं हे ‘पाणी’ काही वेगळंच आहे याची जाणीव समस्त नाटय़सृष्टीला करून दिली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांच्या पुढील वाटचालीकडे जाणकारांचं बारकाईनं लक्ष आहे. गेल्या वर्षी रुईया महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘एकादशावतार’ या एकांकिकेचं दीर्घाकात रूपांतर करून त्याचे प्रयोग रुईया ‘नाटय़वलय’चे विद्यार्थी सध्या सादर करीत आहेत. (त्याबरोबरीनेच यंदाच्या ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ या एकांकिकेचे प्रयोग होत आहेत. या दोन्ही एकांकिका आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धातून विजेत्या ठरल्या आहेत.)

सध्या एकूणच आसमंतात धर्माध उन्माद वाढतो आहे. राजकारणात सत्तेचे सोपान चढण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण हा राजमार्ग ठरतो आहे. आजवर ज्या भारतीय जनतेची सर्वधर्मसमभावाची शहाणीव नावाजली जात होती, तीच जनता आज या धार्मिक, भावनिक उन्मादाला का बळी पडते आहे, हा भल्याभल्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यावर उतारा काय, हे कुणालाच कळेनासे झाले आहे. राजकारण्यांना तर असे ‘ज्वर’ फायद्याचेच असतात. ते त्यात तेल ओतून नामानिराळे राहतात. होरपळतात ती सर्वसामान्य माणसे! आणि राजकारणी मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात ढेकर देतात आणि वर उजळ माथ्याने मिरवत राहतात.

प्राजक्त देशमुख लिखित ‘एकादशावतार’ या सद्य:स्थितीकडेच निर्देश करतो. बुद्रुकवाडीतील कुणी एक भावश्या हा तरुण गावातलं प्रतिगामी, जुनं नेतृत्व उखडून टाकण्यासाठी गावच्या जत्रेचा घाट घालतो. आजवर जे कधी घडलं नाही ते गावात या जत्रेनिमित्तानं घडवायचं त्याच्या मनात असतं. जत्रेत एक पौराणिक नाटकही त्याने ठेवलेलं असतं.  (अर्थात या सगळ्यात गावचं भावी नेतेपद भूषवायचं स्वप्नही भावश्या पाहत असतोच.) जत्रेनिमित्ताने गावात नवा उत्साह संचारतो. या घडामोडींमुळे गावचे सरपंच आणि त्यांचे पित्ते खवळतात. पण राजकारणाचे डावपेच थंड डोक्याने खेळायचे असतात हे सरपंच जाणून असतात. योग्य वेळेची ते वाट बघत असतात.

आणि ती संधी त्यांना आपसूक मिळते.

जत्रेतल्या नाटकात विष्णूचं काम करणारा नट वाटेतला मोर्चा आंदोलनाने त्याची गाडी अडकल्याने गावात पोहोचू शकत नाही. तो अध्र्या वाटेतूनच माघारी जातो. ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांवर बेतलेल्या या नाटकात विष्णूविना नाटक होणं दुरापास्त असतं. परंतु भावश्याने हग्या दम दिल्याने नाटक मंडळींपुढे विष्णूविना नाटक सादर करण्यावाचून पर्यायच उरत नाही. ते कसंबसं शक्कल लढवून विष्णूविनाच नाटक सादर करतात. गावकरी मंडळी नाटकावर फिदा होतात. परंतु सरपंच गावाच्या वतीने बोलायला उभे राहतात आणि नाटक मंडळी व भावश्यावर तुटून पाडतात. विष्णूच्या पात्राविना सादर झालेलं हे नाटक म्हणजे आपल्या देवदेवतांचा अपमान आहे, देव असले काय अन् नसले काय, यांना काहीच फरक पडत नाही, हे पाखंडी आहेत.. वगैरे वगैरे टीकेची झोड उठवतात. गर्दीला डोकं नसतं, ही उक्ती सरपंच पुरती जाणून असतात. त्यांच्या भाषणाने गावकरी खवळून उठतात. भावश्या आणि नाटकवाल्या मंडळींना ते बेदम मारहाण करतात. जाळपोळ, हाणामारी, दगडफेक.. एकच कल्ला होतो. ज्या जत्रेचा घाट घालून भावश्याने आपलं नवं नेतृत्व रुजवायचा प्रयत्न केलेला असतो, ते सरपंचानं धर्माधतेच्या शस्त्राने धुळीस मिळवलेलं असतं.

शेवटी पोएट (कवी) एका हाती झाडू घेऊन, कविता म्हणत ती उद्ध्वस्तता नष्ट करायला निघतो..

लेखक प्राजक्त देशमुख यांनी सद्य:स्थितीवर प्रकाश टाकतानाच या दीर्घाकाद्वारे सर्जनशील व्यक्तिमत्त्वंच या अशांत, अवस्थेतून मार्ग काढू शकतील असा आशावाद जागवला आहे. पात्ररेखाटन, दृश्यनिर्मिती, नाटय़पूर्णता आणि वैचारिक मांडणी याचा समुच्चय प्रत्यय ‘एकादशावतार’मध्ये त्यांनी घडवून आणला आहे. एकांकिकेतील कथेची मर्यादा त्यांनी दीर्घाकात ओलांडली आहे. छोटी-मोठी पात्रं, त्यांचं वागणं-बोलणं, जत्रेचा माहोल, गावातलं राजकारण, त्याचे नानाविध पदर आणि ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ छापाची जनता यांच्या समान्वित पटावर ‘एकादशावतार’ उत्तरोत्तर रंगत जातो.

दिग्दर्शक रणजीत पाटील यांनी हा सगळा पट रंगमंचावर मोठय़ा ताकदीनं सादर केला आहे. अचूक पात्रनिवड, त्यांच्या संवादओळीवर केलेलं काम, समूहदृश्य हाताळणीतलं कौशल्य आणि आशयाचा तोल जाऊ न देण्याची कसोशी या सगळ्याच कसोटय़ांवर ते खरे उतरले आहेत. एक चित्रदर्शी अनुभव त्यांनी प्रेक्षकांना दिला आहे. सचिन गावकर (नेपथ्य), मंदार पिलवलकर (संगीत), अमोघ फडके (प्रकाशयोजना), शरद सावंत (रंगभूषा) आणि हिमानी कुलकर्णी (वेशभूषा) यांची तेवढीच तोलामोलाची साथ त्यांना लाभली आहे.

जयेश वाव्हळ (भावश्या), श्रीनाथ म्हात्रे (कीर्तनकार / नारद), निनाद जाधव (सरपंच), ओंकार मोरे (मेंबर), सुहास अलदार (पोएट), अक्षता आपटे (निवेदिका), स्वागत  मेदगे (ब्रह्म), अजिंक्य मंचेकर (शंकर), स्वानंद केतकर (इंद्रदेव) आदी कलाकारांनी हे ‘हॅपनिंग’ घडवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

Story img Loader