केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २३ मार्चला ४६ वा वाढदिवस साजरा केला. एकेकाळच्या नावाजलेल्या टीव्ही अभिनेत्री ते राजकारण हा स्मृती इराणी यांचा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. त्या एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी या प्रसिद्धीझोतात आल्या. या मालिकेत त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. आज राजकारणात सक्रिय असलेल्या स्मृती इराणी अभिनय क्षेत्रातील त्यांच्या जुन्या सहकाऱ्याच्याही संपर्कात आहेत. एकता कपूरशी तर त्यांची खास मैत्री आहे. अशात स्मृती इराणी यांच्या वाढदिवशी एकता कपूरच्या ३ वर्षीय मुलानं लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
एकता कपूरनं तिच्या इन्स्ट्ग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिचा मुलगा रवी यानं मावशी स्मृती ईराणी यांच्यासाठी लिहिलेली खास नोट शेअर केली. या नोटमध्ये त्यानं लिहिलंय, ‘प्रिय स्मृती मावशी, मी तीन वर्षांचा आहे आणि मला माहीत आहे की मी तुम्हाला फार कमी वेळा भेटलोय. माझ्या आईनं एक चांगली गोष्ट केली आहे. ती अशी की तिच्या मते तिने तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत. जसं की ती बरेचदा काही गोष्टी वाचून दाखवते. मी माझ्या आसपासच्या लोकांना तुमच्याबद्दल बोलताना ऐकतो. ते म्हणतात की, तुम्ही खूप शक्तिशाली आहात. पण माझ्यासाठी तुम्ही माझ्या प्रेमळ मावशी आहात. मला माहीत आहे तुम्ही माझ्यापासून दूर असलात तरीही तुमचं माझ्यावर खूप प्रेम आणि तुम्ही माझी काळजी देखील करता.’
आणखी वाचा- धनुषच्या चाहत्यांना आणखी एक धक्का! एक्स वाइफ ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय
रवीने पुढे लिहिलं, ‘आज तुमचा वाढदिवस आहे आणि मी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. कदाचित तुम्ही त्या काही निवडक लोकांपैकी एक आहात ज्यांनी मला पाहिलं होतं आणि आशीर्वाद दिले होते. त्यातले काही आशीर्वाद मला तुम्हाला आज परत द्यायचे आहेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला माहीत आहे जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मी महिलांचा आदर करेन. कारण तुमच्यासारखी स्त्री माझी मावशी आहे. आणि मला खात्री आहे मी जर कधी चुकलो तर तुम्ही मला ओरडाल आणि मला मार्गदर्शनही कराल. खुप सारं प्रेम, लवकरच भेटू. तुमचा भाचा- रवी.’
आणखी वाचा- तब्बल ३ महिन्यांनंतर समोर आलं विकी- कतरिनाच्या लग्नाचं धक्कादायक सत्य, विवाहित असूनही…
एकता कपूरच्या या पोस्टवर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी रवीचं कौतुक केलं आहे. या पोस्टवर कमेंट करताना त्यांनी लिहिलं, ‘माझ्या रवी बाळा, मी तुला कधीच ओरडणार नाही. तू सर्वांनी प्रेमाने आणि आदराने वागशील याची मला खात्री आहे. तुझी प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.’ सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी वयाच्या २१ व्या वर्षी फेमिना मिस इंडिया (१९९८) या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये आतिश या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. स्मृती यांनी २००३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मानव संसाधन मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. स्मृती इराणी सध्या अमेठीमधून लोकसभेच्या खासदार आहेत.