बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर आई झाली आहे. एकताने सरोगसी पद्धतीने एका मुलाला जन्म दिला आहे. २७ जानेवारीला तिच्या मुलाचा जन्म झाला.एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर हा देखील सरोगसीच्या माध्यमातून सिंगल पॅरेंट बनला होता. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आता एकताही सिंगल मदर बनली आहे. एकताने ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. त्यानंतर तिने या चिमुल्याचं नावही जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकताने तिच्या बाळाचं नाव रवी कपूर असं ठेवलं असून एकताचे वडील जितेंद्र यांच्या नावावरुन तिने हे नाव ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. एकताने सोशल मीडियावर बाळाचं नाव जाहीर केलं. या नावासोबतच तिने एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

‘आई होण्यासारखा दुसरा आनंद या जगात नाही.माझ्या आयुष्यात आता हे पालकत्वाचं पर्व सुरु झालं आहे. सध्या मी माझ्या बाळामध्ये पूर्णपणे गुंतले आहे. माझं संपूर्ण कुटुंब आता माझ्यासोबत आहे आणि सारेच या बाळाच्या आगमनामुळे आनंदात आहेत. हा अनुभव मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. फक्त ते अनुभवू शकते’, असं एकताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एकता सरोगसी पद्धतीने आई झाली असून बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सरोगसी पद्धतीचा अवलंब करुन पालकत्व स्वीकारलं आहे. बॉलिवूडमध्ये तुषार कपूर प्रमाणेच करण जोहर हा देखील सिंगल पॅरेंट आहे. त्यालाही सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळी मुलं आहेत.