बालाजी टेलिफिल्म्सचे कार्यालय आणि बालाजीची सर्वेसर्वा एकता कपूर हिच्या निवासस्थानासह सात ठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये ३० कोटींचे उत्पन्न न दाखवून करचुकवेगिरी करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी जाहीर केले.
तीन दिवसांच्या तपासणीनंतर ही करचुकवेगिरी पकडली गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बालाजी टेलिफिल्म्सच्या कार्यालयाबरोबरच कंपनीची सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकता कपूर आणि तिचे वडील जितेंद्र यांच्या जुहू येथील निवासस्थानीही प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापे घातले होते. शंभरहून अधिक प्राप्तिकर अधिकारी बालाजी टेलिफिल्म्सचे स्टुडिओ आणि इतर मालमत्तांसह सात ठिकाणी तपासणी करत होते. यात एकताचा भाऊ तुषार कपूरच्या वांद्रे येथील निवासस्थानाचाही समावेश होता.
या तपासणीतून एकंदरीत ३० कोटी रुपये उत्पन्न दडवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या करचुकवेगिरीबद्दल एकता कपूरची चौकशी झाली असता तिने आपण फक्त चित्रपट आणि मालिका निर्मितीत लक्ष घालत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बालाजी प्रॉडक्शन हाऊसचे आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आल्याचे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता प्रॉडक्शन हाऊसने या ३० कोटी रुपयांवर कर भरण्याची तसेच दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार या रक्कमेवरचा ३० टक्के कर आणि दंडाची रक्कम प्राप्तिकर खात्याकडे जमा करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कारवाईच्या धामधुमीत बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेला ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ हा चित्रपट शुक्रवारी देशभर प्रदर्शित झाला आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा