‘डर्टी पिक्चर्स’मध्ये आपल्याच वडिलांवर चित्रीत झालेल्या एका गाण्याचे नवे रूप दाखवणारी एकता कपूर आता आपल्या वडिलांच्याच एका चित्रपटाचे आधुनिक रूप घेऊन येणार आहे. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागीन’ या चित्रपटाचा आधुनिक अवतार घेऊन येण्याचा प्रयत्न एकता करणार आहे.
पूर्वीच्या ‘नागीन’मध्ये प्रेक्षकांच्या त्या वेळच्या संवेदनशीलतेचा विचार करण्यात आला होता. मात्र आता तोच चित्रपट आजच्या प्रेक्षकांना दाखवायचा झाला तर, त्याच्या कथानकात खूप बदल करावे लागतील. त्या कथानकाला आधुनिक स्वरूप द्यावे लागेल. आम्ही सध्या तेच काम करत असून संहिता दोन महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागीन’मध्ये सुनील दत्त, फिरोज खान, जीतेंद्र, संजय खान, विनोद मेहरा, रेखा, मुमताज यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. तर रिना रॉयने शीर्षक भूमिका निभावली होती. आता जीतेंद्र आणि रिना रॉय यांच्या भूमिका कोण करणार, असा प्रश्न आहे. मल्लिका शेरावतला एका ‘नागीन’चा अनुभव असल्याने कदाचित तिलाही विचारणा होऊ शकते. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोणते कोणते कलाकार या चित्रपटात दिसतील, हे आत्ताच सांगणे कठीण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
‘नागीन’ बरोबरच बालाजी मोशन्स पिक्चर्स सध्या ‘मिलन टॉकीज’ या चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया करणार आहे. तसेच एका लहानश्या गावातील तरुणीची भूमिका प्रियांका चोप्रा करणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान या चित्रपटाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा