रसिका शिंदे-पॉल
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी (१६ एप्रिल) होणार आहे. या निवडणुकीसाठी रंगकर्मी नाटय़ समूह आणि आपलं पॅनल असे दोन गट समोरासमोर उभे आहेत. यशवंत नाटय़ संकुलाची पुनर्बाधणी यासह अनेक प्रश्नांमुळे परिषद आणि निवडणूक गेले अनेक महिने चर्चेत आहे. परिषदेच्या चर्चेतील तीन मुद्दय़ांवर आपलं पॅनल गटाचे प्रमुख प्रसाद कांबळी आणि रंगकर्मी नाटक समूह गटाचे प्रमुख प्रशांत दामले यांच्याशी साधलेला संवाद.
- अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्यामागचा आणि गटाचा उद्देश काय?
प्रशांत दामले- आमचा समूह गेले अनेक वर्षे सामाजिक कार्य करत आहे. परंतु त्याहून मोठे व्यासपीठ मिळत असेल तर आपण अजून चांगले काम करू शकतो आणि विविध घटकांपर्यंत पोहोचू शकतो अशी प्रामाणिक भावना असल्यामुळे परिषदेची पंचवार्षिक निवडणूक लढवावी असे वाटले. नाटय़ परिषदेत केवळ नाटकांचाच भाग आहे असे नाही, तर तेथे लावणी, ऑर्केस्ट्रा, वादक मंडळी अशा सर्व कलांच्या सादरीकरणाला पाठिंबा देणे हे परिषदेचे काम आहे. त्यादृष्टीने आपण या सर्व कलावंतांसाठी काही काम करू शकतो का असा विचार करून हे पॅनल उभे राहिले. रंगमंच कामगारांचा विमा, लावणी संस्थांच्या पुन्हा उभारणीसाठी देखील काम करण्याचा आमच्या पॅनलचा उद्देश आहे. जबाबदारी आल्यास ती पूर्ण करण्याचा आमचा मानस असेल.
प्रसाद कांबळी- या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभा राहणार नव्हतो हे मी अधिकृतरीत्या जाहीर केले होते, परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नाटय़ परिषदेत काही गोष्टी घडत गेल्या. त्यावेळी आपलं पॅनल गटातील निर्माते, रंगमंच कामगार आणि इतर सहकाऱ्यांनी अशा परिस्थितीत लढले पाहिजे असे म्हटले आणि त्यामुळेच मी उमेदवारी अर्ज भरला. आपलं पॅनल पुन्हा एकदा रिंगणात आले. मुळात आमच्या गटाने पाच वर्षे नाटय़ परिषदेवर काम केले आहे. नाटय़ परिषदेला आर्थिक शिस्त लावण्याचा आणि त्यातून कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागील (बॅकस्टेज) कलाकार, व्यवस्थापक, नोंदणी कारकून, निर्माते या सगळय़ांच्या अडचणी दूर करण्याचाही आमचा उद्देश आहे. मराठी रंगभूमीचा पाया असलेल्या रंगमंच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
- नाटय़ निर्माता संघात फूट पडली त्याचे पडसाद भविष्यात नाटय़ परिषदेत दिसणार का?
प्रशांत दामले- नाटय़ परिषदेत भूतकाळात कोणत्या गोष्टी घडून गेल्या यावर मी भाष्य करणार नाही. त्यावर चर्चा करून काहीही साध्य होणार नसल्यामुळे आमच्या ध्येयापासून विचलित न होता आम्हाला काम करायचे आहे. रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यात काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो परिषदेच्या कामकाजाच्या माध्यमातून दूर करायचा आहे.
प्रसाद कांबळी- नाटय़ परिषद ही रंगकर्मीची मातृसंस्था आहे. आठ घटक संस्थांची मिळून ही मातृसंस्था तयार झाली आहे. यातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघ आणि रंगमंच कामगार संघ. परंतु करोनाच्या काळात ज्यावेळी नाटय़ निर्माता संघाची गरज होती त्यावेळी राजकीय नाटय़ घडले आणि नवा संघ तयार झाला. परंतु हेच नाटय़ भविष्यात परिषदेत घडेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. आमचा गट नित्यनेमाने काम करेल हे मात्र खरे.
- भविष्यात यशवंत नाटय़ संकुलांची पुनर्बाधणी करत असताना या दरम्यान परिषदेचे कामकाज कसे चालणार?
प्रशांत दामले- गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले यशवंत नाटय़ मंदिर खरंच पाडणार आहेत का याचा ठोस अहवाल अजून हाती आलेला नाही. जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत खरं काय आहे हे कळणार नाही. अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप नाही. आहे त्या परिस्थितीत पुनर्बाधणासाठी परवानगी घेणार का? असाही प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळे नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळावर आम्ही जात नाही तोपर्यंत विश्वस्तांचे काय म्हणणे आहे हे आम्हाला कळणार नाही. त्यामुळे १६ एप्रिलनंतरच यशवंत नाटय़ संकुलाचे काय होणार याचे उत्तर मिळेल.
प्रसाद कांबळी- मुळात २००५ पर्यंत नाटय़ परिषदेचे कामकाज मराठी साहित्य संघाच्या कार्यालयातून केले जात होते. त्यानंतर संघाच्या बाजूला असलेल्या एका शाळेच्या खोलीतूनही हा कारभार आम्ही चालवला आहे. भविष्यात ज्यावेळी यशवंत नाटय़ संकुल पाडले जाईल त्यावेळी शासनाच्या अखत्यारीत असलेल्या रवींद्र नाटय़ मंदिरातील एखाद्या कार्यालयातून परिषदेचा कारभार चालू ठेवावा असा शासनाशी पत्र व्यवहार करू. याबाबत नाटय़ परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुलाचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव १० डिसेंबर २०२२ रोजी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यात विश्वस्तांनी म्हटल्याप्रमाणे, यशवंत नाटय़ संकुल पाडून तेथे नाटय़ परिषदेची नवी वास्तू बांधण्यात येणार आहे. जेणेकरून पुढच्या काळात नाटय़ परिषद स्वयंपूर्ण होईल.