एखादा कलाकार एखाद्या लहानशाच भूमिकेत भाव खाऊन जातो आणि मग त्याच्यासाठी पूर्ण लांबीची भूमिका लिहिली जाते असा प्रकार क्वचितच घडतो. विद्युत जमवाल या नवोदित अभिनेत्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. फोर्स या चित्रपटात जॉन अब्राहमशी टक्कर देणाऱ्या खलनायकाची भूमिका विद्युतने केली होती. त्याची हाणामारी आणि एकूणच ‘लूक’ भल्या भल्यांना आश्चर्यचकित करून गेला. त्यात एक नाव होते ते निर्माता विपुल शहा यांचे. कमांडो वन मॅन आर्मी हा चित्रपट म्हणजे विद्युतवरच्या प्रेमाची परिणती आहे.
कमांडो.. या चित्रपटाची कथा एकदम सरळसाधी आहे आणि म्हटलं तर अनेक चित्रपटांमधून पाहिली गेली आहे. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा याचे एकमेव उत्तर म्हणजे विद्युत जमवालची अ‍ॅक् शन. कमांडो या नावावरून चित्रपट कमांडोच्या आयुष्यावर आहे हे कळते. पण यातला कमांडो चित्रपटात केवळ नावापुरताच आहे. एक भारतीय कमांडो जो सर्व प्रकारच्या तंत्रांनी प्रशिक्षित आहे. अतिशय खडतर परिस्थिीतीतही लढण्याचे, निभावून नेण्याचे प्रशिक्षण त्याला मिळाले आहे. असा एक कमांडो तयार करण्यासाठी भारतीय सैन्यदलाला प्रचंड मेहनत, पैसा खर्च करावा लागतो. मात्र त्यांना वर्षांनुवर्षे संयम राखून घडवावेही लागते. असा प्रशिक्षित तयार कमांडो एका चुकीमुळे शत्रू देशाच्या ताब्यात सापडतो. त्याला वाचविण्याऐवजी तो आमचा सैनिकच नाही अशी भूमिका देशाकडून घेतली जाते तेव्हा नेमके आपण काय गमावले, केवळ एक कमांडो की वर्षांनुवर्षे त्यावर घेतलेली मेहनत, लागलेला पैसा आणि सगळ्यात मोठं म्हणजे एका सैनिकाचा देशावरचा विश्वास. अशी कमांडोची वनलाईन खरंतर असायला हवी होती. दुर्दैवाने चित्रपटात ती वनलाईन म्हणण्यापुरतीच येते बाकी चित्रपट फारच सरधोपट मार्गाने पुढे सरकत राहतो. त्यामुळे चित्रपटात त्यातल्या त्यात चांगले आणि नावीन्यपूर्ण काही असेल तर तो अभिनेता विद्युत जामवाल.
केवळ विद्युतची अ‍ॅक् शन दाखविण्यासाठी कमांडो हा चित्रपट केला गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण मुळात हा अ‍ॅक् शनपट असला तरी तो सगळ्या देमारपटांसारखा अतार्किक वाटत नाही त्याचे एकमेव कारण हे विद्युतच्या अ‍ॅक् शन दृश्यांमध्ये आहे. त्याने या चित्रपटातील सगळे अ‍ॅक् शन स्टण्ट कुठलेही बॉडी डबल्स न वापरता केले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अ‍ॅक् शन दृश्यांमध्ये किक मारण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उडय़ा, गिरक्या यांच्यासाठी कुठल्याही वायर्स,किंवा फाईट तंत्रांचा आधार त्याने घेतलेला नाही. त्यामुळे ही अ‍ॅक् शन दृश्ये बऱ्याच प्रमाणात रांगडी आणि खरी वाटतात. कमांडो बघताना आपल्याला सिल्व्हेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बोपटांपासून अजय देवगणच्या फूल और काँटे, हलचल यांसारख्या सुरुवातीच्या अ‍ॅक् शनपटांची आठवण होते. या चित्रपटासाठी रॅम्बोमध्ये सिल्व्हेस्टर स्टेलॉनचा जो ‘लूक’ होता, त्याचे व्यक्तिमत्व होते त्याचाच आधार कमांडो करणवीर डोग्रासाठी अर्थात विद्युतसाठी घेण्यात आला आहे. त्यात हा चित्रपट हिमाचल प्रदेशच्या आसपास पठाणकोट आणि दिलेरकोटमध्ये घडतो. त्यामुळे चित्रपटाचे छायालेखनही तितकेच नयनरम्य आहे. सावन बैरी हे एकमेव श्रवणीय गीत यात आहे. कथाही एक नायक-नायिका आणि विकृत वाटावा असा खलनायक याच पठडीतील आहे.
त्यामुळे कमांडो या नावाने फसून जाऊन वेगळे काही पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होण्याची शक्यता जास्त. पूजा चोप्रा या नवोदित अभिनेत्रीचा वावरही तितकाच सफाईदार आहे. मात्र या पलिकडे जात बदलत्या काळानुसार चित्रपटांमध्ये बदलत जाणारे प्रवाह, येणारे नवीन नवीन कलाकार, त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता लक्षात घेतल्या तर थंड चेहऱ्याने आणि कडक अ‍ॅक् शनने हिरो म्हणून सुरुवात करणाऱ्या अजय देवगणनेही आपला एक प्रेक्षकवर्ग तयार केलाच.
विद्युत जमवाललाही तशी किमया साधता येईल की नाही हे येता काळ ठरवेल. पण अ‍ॅक् शनचा एक वेगळा प्रयोग म्हणून त्याच्या कमांडोची एकदा दखल घेता येईल.
कमांडो द वन मॅन आर्मी
निर्माता-विपुल शहा, दिग्दर्शक -दिलीप घोष, छायालेखक – सेजल शहा कलावंत – विद्युत जामवाल, पूजा चोप्रा, दर्शन जरीवाला, जयदीप अहलावत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा