कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही नेहमीच अवघड गोष्ट असते. दिग्दर्शक हा जरी चित्रपटाच्या टीमचा कप्तान मानला तरी निर्मात्यांशिवाय चित्रपटाचा श्रीगणेशाही करणे कठीण होऊन बसते. कित्येक पटकथा वर्षांनुवर्ष निर्माते मिळत नसल्यामुळे धूळ खात पडून राहतात. या सगळ्या पाश्र्वभूमीवर एखाद्या चित्रपटासाठी एखाद-दुसरा निर्माता मिळणेही जिथे आनंदाची गोष्ट ठरते, तिथे डॉ. मीना नेरुरकर यांचे पहिलेच दिग्दर्शन असणाऱ्या चित्रपटासाठी अकरा निर्मात्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘डॉट कॉम मॉम’ या आगामी मराठी चित्रपटाला अकरा निर्माते लाभले आहेत.
आई आणि मुलाच्या भावनिक नात्यातली गुंतागुंत रेखाटणाऱ्या ‘डॉट कॉम मॉम’ या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना नेरुरकर या मराठी चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते आणि दिग्दर्शन असा सगळाच भार मीना नेरुरकर यांनी उचलला असला तरी चित्रपटाच्या निर्मितीचा भार मात्र त्यांनी अकरा निर्मात्यांवर सोपवला आहे. डॉ. मीना नेरुरकर हे फार मोठे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची डॉक्टर म्हणून असलेली अमेरिकेतील कारकीर्द जेवढी मोठी आहे, तितकीच त्यांनी लिहिलेली पुस्तके, लेखमाला ही साहित्यसंपदाही भव्य आहे. त्यांच्याशी एका कार्यक्रमात भेटीचा योग आला आणि मग गप्पांमधून चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने विचार सुरू झाला, अशी माहिती या चित्रपटाच्या अकरा निर्मात्यांपैकी एक असलेल्या अभिजित पाटील यांनी दिली.
‘भूमी एन्टरटेन्मेट’ असे नाव आपल्या बॅनरला या अकरा निर्मात्यांनी दिले आहे. आम्ही खरे तर अकरा मित्र आहोत. प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे. आमच्यापैकी कोणी बिल्डर आहे, आर्किटेक्ट आहे, वकील आहे, इलेक्ट्रिक वस्तूंचा पुरवठादार असलेला आमचा मित्र आहे. असे सगळे आम्ही अकरा जण मित्र नेहमीच कुठल्याही प्रसंगी एकत्र असतो, असे पाटील यांनी सांगितले. चित्रपट या माध्यमाबद्दल सगळ्यांप्रमाणेच आम्हालाही उत्सुकता होती. सगळ्यांनी मिळून एखादा चित्रपट करावा असे स्वप्न मनात घर करू लागले होते. त्याच वेळी डॉ. मीना नेरुरकर यांच्या संपर्कात आलो. त्यांनाही त्यांचे चित्रपट दिग्दर्शनाचे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि आम्हालाही एक चांगले कथानक असलेला चित्रपट करायचा होता. मराठीत चित्रपटांना चांगले निर्माते मिळत नाहीत ही अडचणही आम्ही ऐकून होतो. या सगळ्याचा विचार करता चित्रपट निर्मितीचे शिवधनुष्य एकदा पेलून पाहायचेच असा निर्धार अकरा मित्रांनी केल्याचेही पाटील यांनी सांगितले. ‘डॉट कॉम मॉम’ या चित्रपटाची निर्मिती संतोष राऊत, निशांत पी. पाटील, प्रशांत पी. पाटील, मिलिंद चौधरी, भूषण सावे, विनीत पाटील, विवेक फडके, राजेश मेहता, राजेश जैन, रीमा महेंद्र केणी आणि अभिजित पाटील या अकरा जणांची असणार आहे. चित्रपटाचे पहिले चित्रीकरण सत्र पालघरमध्ये सुरू झाले असून यात स्वत: डॉ. मीना नेरुरकर यांच्याबरोबर विक्रम गोखले, साई गुंडेवार, दीप्ती लेले, आशा शेलार, राम कोल्हटकर, विजय चव्हाण आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा