हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणा-या दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट आज बालदिनाच्या औचित्यावर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वच वयोगटातील मुलांसाठी एक भेट ठरणारा आहे.
ज्ञानेश (श्रीरंग) हा एक हुशार मुलगा ज्याचं एलिझाबेथवर म्हणजे त्याच्या सायकलवर अतोनात प्रेम असतं. ही एलिझाबेथ आहे त्याच्या वडिलांनी तयार केलेली अनोखी सायकल. आपल्या वडिलांची आठवण असलेली ही सायकल ज्ञानेश आणि त्याची बहिण झेंडूचा (सायली) जीव की प्राण असते. ज्ञानेशच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ज्ञानेशच्या आईवर (नंदिता) येते. शिवणकाम, स्वयंपाकाची कामे करून ती दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण करत असते. पण कर्ज न फेडल्यामुळे बँक त्यांचे शिवणकामाचे यंत्र घेऊन जाते. घरात आलेल्या अडचणींमुळे त्यांची आई एलिझाबेथला विकण्याचा निर्णय घेते. आपली सायकल विकली जाऊ नये म्हणून ही दोन्ही मुले आपल्या मित्रांच्या मदतीने एकादशीला बांगड्यांचं दुकान मांडतात. मात्र, या दुकानाला आईचा नकार असल्यामुळे मुलांना गुपचूप दुकान चालवावे लागते. सुरुवातीला एलिझाबेथलाच दुकानाचे रूप देण्यात येते. त्यानंतर त्यांच्या मित्राच्या आईने दिलेल्या मोडक्या बाजेवर हे दुकान मांडण्यात येते. बांगड्या विकून मिळालेल्या पैशातूनचं अखेर बँकेचे कर्जही फिटते आणि मुलांची एलिझाबेथही त्यांच्याकडेच राहते.
चित्रपटाची कथा ही नेहमीच्या धाटणीची आहे. गरिब कुटुंबातील मुलांचे भावविश्व या चित्रपटात साकारण्यात आले आहे. घरातील परिस्थिती सावरण्यासाठी मुलांनी लावलेला हातभार थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला असला तरी या चित्रपटाचा विषय आपल्याला खिळवून ठेवण्यास असमर्थ ठरतो. पण चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे ती यातील संवाद आणि त्याला साजेसा असा अभिनय. ‘एलिझाबेथ एकादशी’चे प्रमुख कलाकार आहेत ती यातील मुले. श्रीरंग, सायली आणि त्यांच्या मित्राची भूमिका करणारा पुष्कर. या तिनही मुलांचा अभिनय एखाद्या मोठ्या कलाकाराच्या तोडीस तोड असाच आहे. विशेष कौतुक करायला हवे ते दिग्दर्शकाचे. मुलांमधील लहानपण तसेच टिकवून त्यांच्याकडून दिग्दर्शकाने सुंदर अभिनय करून घेतला आहे. ‘गरम चाय गरम चाय’ ऐकल्यावर ‘बांगड्या गरम बांगड्या गरम’ असे ओरडणारी आणि आपल्या भावावर अतोनात प्रेम करणारी झेंडू म्हणजेच सायली ही फार गोंडस वाटते. विठ्ठलाची वाणी बोलणा-या भूमिकेतला श्रीरंग आणि पानाचं दुकान असलेला, तोंडात सतत शिव्या असणा-या मुलाच्या भूमिकेतील पुष्कर हे दोघे लक्ष वेधून घेतात. मुलांच्या तोंडचे सहज संवाद आणि देहबोली अर्धा चित्रपट यशस्वी करतात. उत्तम संवादलेखनाचे योग्य उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिचादेखील खास उल्लेख करावासा वाटतो. कथा जरी सामान्य असली तरी त्यातही वेश्याव्यवसाय करणा-या महिलांचा विषय तिने चित्रपटातून समोर आणला आहे. परिस्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे काही महिलांना वेश्याव्यवसायात जावे लागते. पण त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हे नेहमीच चुकीचा राहिलेला आहे. याही महिलांना भावना असतात हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. पंढरपूरला एकादशीच्याच वेळी चित्रपटाचे चित्रिकरण झाल्याने पंढरपूर दर्शन घडते. तेथील लोकांचे राहणीमान, बोली, जीवनशैली यात पाहावयास मिळते. चित्रपटात एकच गाणे आहे आणि ते श्रवणीय आहे.
चित्रनगरीः एलिझाबेथ एकादशी
ज्ञानेश (श्रीरंग) हा एक हुशार मुलगा ज्याचं एलिझाबेथवर म्हणजे त्याच्या सायकलवर अतोनात प्रेम असतं. ही एलिझाबेथ आहे त्याच्या वडिलांनी तयार केलेली अनोखी सायकल
आणखी वाचा
First published on: 14-11-2014 at 09:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elizabeth ekadashi movie review