Elvish Yadav Drugs Case: दोन महिन्यांपूर्वी एक नाव अचानक चर्चेत आलं होतं. ते नाव होतं एल्विश यादव याचं. आणि कारण होतं Bigg Boss OTT च्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाचं. मुळात यूट्यूबर म्हणून एल्विश यादव बिग बॉसच्या आधीही नेटिझन्समध्ये आणि विशेषत: तरुणाईमध्ये चिरपरिचित होताच. पण बिग बॉस ओटीटीच्या विजेतेपदामुळे एल्विश यादवला प्रसिद्धीचं वेगळंच वलय मिळवून दिलं. त्याच प्रसिद्धीच्या जोरावर त्याच्यासाठी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीची आरती करण्याचा योग जुळून आला. पण आता पुन्हा एकदा हे नाव चर्तेत आलं आहे, पण यंदा एल्विशसाठी अडचणींचा डोंगर घेऊन!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एल्विश यादवविरोधात नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इथल्या एका रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्जसाठी सापाचं विष पुरवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. हे आरोप एल्विशनं फेटाळले असले, तरी पोलीस सखोल तपास करत आहेत. त्यात एकनाथ शिंदेंच्या घरी त्यानं आरती केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून विरोधकांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. तर त्यापाठोपाठ एल्विशनं हातात साप घेतलेला व्हिडीओही सोशल मीडिया साईट्सवर फिरू लागला आहे. त्यामुळे अनेकांना एल्विश यादव नेमका कोण आहे? असा प्रश्न पडू लागला आहे.

कोण आहे एल्विश यादव? उत्तर…

हरियाणातील गुरागावच्या वझिराबादमध्ये जन्म झालेल्या एल्विश यादवचं खरं नाव सिद्धार्थ यादव आहे. अमित्य युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर दिल्ली विद्यापीठात त्यानं उच्च शिक्षण घेतलं. २०१६ मध्ये यूट्यूबर म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला. २९ एप्रिल २०१६ रोजी त्यानं त्याचं पहिलं यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्याच्या विनोदी हिंदी बोलण्याच्या शैलीमुळे सर्वच वयाच्या प्रेक्षकांना त्यानं आपल्याकडे आकर्षित केलं.

हळूहळू त्याचे सबस्क्रायबर्स तब्बल १२ मिलियन अर्थात १ कोटी २० लाखांच्या घरात गेले. आता त्याच्या नावावर ‘Elvish Yadav’ (१२.३ मिलियन सबस्क्रायबर्स) याच्यासह ‘Elvish Yadav Vlogs’ (५.५३ मिलियन सबस्क्रायबर्स) असे दोन यूट्यूब चॅनल्स आहेत.

“…तर महाराष्ट्रातील अनेक नेते अडचणीत येतील”, एल्विश प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले? वाचा…

बिग बॉसमध्ये प्रवेश…टर्निंग पॉइंट

यावर्षी १३ जुलै रोजी एल्विश यादवला बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सत्रात वाईल्ड कार्डद्वारे एंट्री मिळाली. अगदी थोड्या काळात एल्विशला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा पाठिंबा मिळू लागला. इतर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धक असूनही एल्विश चर्चेच्या झोतात आला. आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात एल्विश लवकरच विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक ठरला. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तो विजयी झाला आणि त्याचं नाव घराघरांत पोहोचलं.

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता म्हणून प्रसिद्धीच्याही पलीकडे एल्विश इतरही काही गोष्टींशी संबंधित आहे. त्याचा स्वत:चा ‘systumm_clothing’ नावाचा कपड्यांचा ब्रँडही आहे. त्याशिवाय, आपण सामाजिक कार्यातही असल्याचं एल्विशनं बिग बॉसच्याच एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elvish yadav bigg boss ott season 2 winner fir in snake venom for rave party in noida pmw