‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता व लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवला १७ मार्चला अटक करण्यात आली होती. रेव्ह पार्टीत सापांचे विष पुरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. तसंच, नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट १९८५ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. परंतु, हा कायदा आता मागे घेण्यात आला आहे. कारकुनी चुकीतून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं नोएडा पोलिसांनी सांगितलं. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२०२३ नोएडा सेक्टर ३९ मध्ये एल्विशच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. गेल्यावर्षी पोलिसांनी एका पार्टीवर छापा टाकला होता. तेव्हा त्यांनी नऊ साप जप्त केले होते. त्यात पाच कोब्रोचा समावेश होता. त्यांच्याकडून सुमारे २० मिली सापाचे विष जप्त करण्यात आले. साप आणि सापाच्या विषाचा पुरवठा केल्याचा आरोप असलेल्या एल्विशवर नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत आरोप आहेत.
एल्विशविरोधात एनडीपीएस कायदा हटवण्यात आला आहे. पोलीस म्हणाले, आम्ही चुकून एनडीपीएस कायदा लागू केला होता. ही कारकुनी चूक होती. एनडीपीएस कायद्यात जामीन मिळणे अवघड आहे.
एखाद्या व्यक्तीला कोणतेही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाचे उत्पादन, शेती, ताबा, विक्री, खरेदी, वाहतूक, साठवण आणि सेवन करण्यास प्रतिबंधित करण्यासाठी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा १९८५ लावला जातो.
एल्विशला जामीन मिळणार का?
२० मार्च रोजी जामीन सुनावणी दरम्यान एल्विश यादवला कोणताही दिलासा मिळाला नाही.स्थानिक बार असोसिएशनच्या संपामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे एल्विश यादवला अद्यापही जामीन मिळालेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
नोव्हेंबर महिन्यात नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारुडींना अटक केली होती. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले होते. या आरोपींनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. त्यानंतर एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात एल्विशला अटक झाली आहे. आरोप सिद्ध झाल्यास मी नग्न होऊन नाचेन असं विधान काही दिवसांपूर्वी करण्याऱ्या एल्विशने आता गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.